Smriti Mandhana Broke Mitali Raj Record: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांमध्ये नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. पावसामुळे हा सामना नियमित वेळेपेक्षा २ तास उशिराने सुरू झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुल्फार्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर फलंदाजीला उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे.

भारतीय महिला संघाची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. स्मृतीने तिच्या डावात २१ धावा पूर्ण करताच टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजचा एक मोठा विक्रम मोडला आणि तिला मागे टाकत पहिलं स्थान गाठलं आहे. स्मृती मानधना महिला विश्वचषकात चांगल्या फॉर्मात आहे.

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी फायनलमध्ये चांगली भागीदारी रचत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. स्मृती मानधनाने आतापर्यंत २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात ४०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय महिला खेळाडू म्हणून एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृतीने आपल्या नावे केला आहे.

टीम इंडियाची माजी कर्णधार मिताली राजच्या नावे विश्वचषकात सर्वाधिक नावा करण्याचा विक्रम होता. तिने २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात ४०९ धावा केल्या होत्या, तर स्मृती मानधनाने २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ४१६ पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. स्मृती अजूनही मैदानावर कायम आहे. स्मृतीने सलामीवीर म्हणून विश्वचषक सामन्यांमध्ये भारताला चांगली सुरूवात करून दिली आहे.

एका एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला खेळाडू

स्मृती मानधना – ४१६* धावा (२०२५)
मिताली राज – ४०९ धावा (२०१७)
पूनम राऊत – ३८१ धावा (२०१७)
हरमनप्रीत कौर – ३५९ धावा (२०१७)
स्मृती मानधना – ३२७ धावा (२०२२)