Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Card: भारताच्या वर्ल्डकप विजेत्या महिला भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. स्मृती मानधना म्युजिक डायरेक्टर पलाश मुच्छलसह लग्नबंधनत अडकणार आहे. महिला विश्वचषक सुरू असतानाच स्मृतीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. आता या दोघांच्याही लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने यंदाचा महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ आपल्या नावे केला. या वर्ल्डकपमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा उपकर्णधार स्मृती मानधनाने केल्या आहेत. विश्वचषकाचे सामने सुरू असतानाच पलाश मुच्छलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, स्मृती लवकरच इंदूरची सून होणार आहे आणि यानंतरच स्मृतीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल गेली ७ वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत. पलाशच्या हातावर स्मृतीचा जर्सी नंबरचा टॅटू आहे. SM18या टॅटूवरूनच स्मृती आणि पलाशच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि काही काळानंतर दोघेही एकमेकांबरोबर अनेक फोटो शेअर करू लागले आणि त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला. महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यानंतरचा स्मृती आणि पलाशचा मैदानावरील सेलिब्रेशनचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर दोघांच्याही कुटुंबाची नाव असून लग्नाचं निमंत्रण देणारी वाक्य आहेत. यानंतर पलाश व स्मृतीचं नावदेखील खाली आहे. तर बाजूला पलाश व स्मृतीचा एडिट केलेला फोटोही आहे. पलाशच्या हातात गिटार आहे तर स्मृती त्याच्या बाजूला उभी आहे आणि मागे स्टेडियमचा फोटो आहे.

स्मृती-पलाश कोणत्या दिवशी लग्नबंधनात अडकणार?

स्मृती-पलाशच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे हे खरंय, पण या दोघांनीही किंवा त्यांच्या कुटुंबांनी त्यांच्या लग्नाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल २० नोव्हेंबर २०२५ ला लग्नबंधनात अडकणार आहेत.