India vs Srilanka, Charith Asalanka Statement: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेने देखील २०२ धावा केल्या. श्रीलंकेकडून धावांचा पाठलाग करताना पथूम निसंकाने दमदार शतकी खेळी केली. पण शेवटच्या चेंडूवर हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. शेवटी सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाने बाजी मारत हा सामना आपल्या नावावर केला. श्रीलंकेकडे सर्वात मोठा विजय मिळवण्याची नामी संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. दरम्यान या सामन्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका काय म्हणाला? जाणून घ्या.

काय म्हणाला श्रीलंकेचा कर्णधार?

सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका म्हणाला, “मला वाटतं याहून आणखी थरारक सामना होऊ शकत नाही. मला वाटतं आम्ही कुलदीप आणि वरुणविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी केली आणि आम्ही सामन्यात शेवटपर्यंत टिकून होतो. निसंका आणि परेरा यांनी अविश्वसनीय फलंदाजी केली. दोघांकडेही चांगला अनुभव होता आणि दोघांनीही उत्तम फलंदाजी केली.”

तसेच तो पुढे म्हणाला , “आशिया चषक स्पर्धेत बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. आम्ही गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये चांगला खेळ केला आहे. पण आम्ही जिंकू शकलेलो नाही. सुपर ओव्हरमध्ये मी त्यांना इतकंच सांगितलं होतं की, जा आणि शक्य होतील तितक्या जास्त धावा करा.”

दोन्ही संघांमध्ये थरारक सामना रंगला. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजीला आला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्माने दमदार ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४९ धावा करत भारतीय संघाची धावसंख्या २०२ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि पथूम निसंका यांनी दमदार खेळी केली.

परेरा अर्धशतकी खेळी करून माघारी परतला. तर पथूम निसंका शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने दमदार शतकी खेळी केली. ५९ चेंडूत त्याने १०७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ६ षटकार खेचले. पण हा सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला अवघ्या २ धावा करता आल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३ धावा करायच्या होत्या. या धावा भारतीय फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर पूर्ण करत सामना आपल्या नावावर केला.