क्रिस्टल पॅलेस क्लबच्या बचावात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत स्ट्रायकर जेर्मेन डेफोईने (८० मि.) अचूक गोल करून संदरलँड क्लबला इंग्ल१श प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेत १-० असा विजय मिळवून दिला. मात्र हा विजय संदरलँडला ईपीएलच्या गुणतालिकेत तळातील तीन क्लबमधून बाहेर काढण्यासाठी पुरेसा नाही. १३ सामन्यांत केवळ नऊ गुणांची कमाई करून क्लब १८व्या स्थानी आहे.
या लढतीपूर्वी क्रिस्टल पॅलेसने १२ सामन्यांत १९ गुणांची कमाई करून ईपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा होती. पहिल्या सत्रात त्यांनी त्या अपेक्षेला साजेसा खेळ केला. रणनीतीची योग्य मांडणी आणि अभेद्य बचाव करून त्यांनी संदरलँडला रोखले. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील संदरलँडची कामगिरी पाहता त्यांच्याकडून फार अपेक्षा नव्हत्या. घरबाहेरील मैदानात संदरलँडला गेल्या २० सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आहेत. येथील सेलहस्र्ट पार्कवर उभय संघ दोनवेळा समोरासमोर आले असून त्यांनी प्रत्येकी एक विजय मिळवला होता.
मध्यंतराचा खेळ गोलशून्य राहिल्यानंतर दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा अवलंबवला. त्यामुळे चुकांचे प्रमाणही वाढले आणि ८०व्या मिनिटाला याचा फायदा मात्र संदरलँडला झाला. डेफोईने पॅलेसच्या बचावपटू स्कॉट डॅन आणि गोलरक्षक व्ॉने हेनेस्सी यांच्यातील झालेल्या गफलतीचा फायदा उचलत गोल केला. याच निर्णायक गोलने संदरलँडने तीन गुणांची कमाई केली. ‘‘योग्य वेळी सामन्याचे चित्र बदलण्याचे कसब डेफोईकडे आहे,’’ अशी प्रतिक्रिया संदरलँडचे प्रशिक्षक सॅम अॅलार्डिक यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
इंग्लिश प्रीमिअर लीग : डेफोईच्या गोलने संदरलँड विजयी
क्रिस्टल पॅलेसने १२ सामन्यांत १९ गुणांची कमाई करून ईपीएलमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती.
Written by पीटीआयझियाउद्दीन सय्यद

First published on: 25-11-2015 at 03:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunderaland beats crystal palace in english premier league