नवी दिल्ली : कसोटी क्रिकेट खेळायचे असेल, तर यशाची भूक दाखवावीच लागेल या कर्णधार रोहित शर्माच्या वक्तव्याचे समर्थन करताना माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेट खेळताना खेळाडूंनी त्यांची पाच दिवस खेळण्यासाठीची तीव्र इच्छाशक्ती आणि दृढनिश्चय दाखवून द्यावा, असा सल्ला दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला सहज घेणाऱ्या खेळाडूंना थेट इशाराच दिला होता. ज्या खेळाडूंना यशाची भूक नसेल, त्यांच्यासाठी संघात जागा नाही असे मत प्रदर्शित केले होते. ‘‘रोहित काही चुकीचे बोलला नाही. गेली अनेक वर्षे मी हे बोलत आलो आहे. भारतीय क्रिकेट आहे, म्हणून खेळाडू आहेत. त्यामुळेच भारतीय क्रिकेटसाठी आपली निष्ठा खेळाडूंनी दाखवायला हवी,’’ असे गावस्कर म्हणाले.

‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) करारबद्ध असणारे खेळाडू रणजी करंडक स्पर्धेत खेळताना दिसत नाहीत, त्यामुळेच ते भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकत नाहीत. कदाचित त्यांनी भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचे नाही असे निश्चित केले असावे. अशा खेळाडूंविषयी तुम्ही काही करू शकत नाही,’’असेही गावस्कर म्हणाले. मात्र, त्यांनी यावेळी कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही.

हेही वाचा >>> नील वॅगनर; सळसळत्या चैतन्याची अनुभूती देणारा योद्धा

‘‘आजचे क्रिकेटपटू क्रिकेटचे प्रारूप निवडण्यापासून गोंधळलेल्या स्थितीत दिसून येतात. क्रिकेटपटूंना मिळालेली ओळख आणि संधी हे भारतीय क्रिकेटच्या पाठिंब्याचेच परिणाम आहेत. या खेळाडूंनी आपली निष्ठा आणि समर्पित भावना दाखवताना हे लक्षात ठेवावे,’’असेही गावस्कर यांनी सांगितले.

गावस्कर यांनी यावेळी कसोटी क्रिकेटसाटी पुरेशी तयारी करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही बदल आवश्यक असल्याचेही सूचित केले. यामध्ये महत्त्वाची सूचना करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने आणि ‘आयपीएल’च्या तयारीचा संघर्ष टाळण्यासाठी रणजी करंडक स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्याची गरज असल्याचे मत मांडले. ‘‘हे बदल इतक्या सहजपणे शक्य नाहीत. पण, अडथळ्यावर मात करता येऊ शकते. युवा प्रतीभेला प्रोत्साहन द्यायचे असेल आणि भारताच्या कसोटी क्रिकेटचे भविष्य बळकट करायचे असेल, तर हे बदल करण्यासाठी प्रयत्न हे आवश्यक आहेत,’’ असे गावस्कर म्हणाले.

रोहित शर्माला मुक्तपणे खेळता येईल

‘‘रोहित शर्मासाठी खूप व्यग्र हंगाम आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका, पाठोपाठ ‘आयपीएल’ आणि लगेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. यामुळे मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला कर्णधार करण्याचा निर्णय स्वागतार्हच आहे. तो तणावमुक्त परिस्थितीत पूर्ण स्वातंत्र्याने फलंदाजी करू शकेल. हार्दिकलाही याचा फायदा होईल,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar supports rohit sharma s statement about hunger in players zws