Suryakumar Yadav with Dunith Wellalage: यंदाची आशिया चषक स्पर्धा भारत-पाकिस्तान सामन्यांसाठी जशी लक्षात ठेवली जाईल, तशी श्रीलंकन खेळाडू दुनिथ वेलाल्गे याच्यासाठीही लक्षात राहिल. १८ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरू असताना दुनिथ वेलाल्गे मैदानात संघाला विजय मिळवून देण्यासाठी धडपडत असताना त्याच्या घरी वडिलांचे दुःखद निधन झाले होते. या दुःखातून सावरत दुनिथ वडिलांचे अंत्यसंस्कार करून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला. शुक्रवारी भारत-श्रीलंकेत चुरशीचा सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दुनिथचे सांत्वन केले. या सांत्वनाचा भावनिक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कपच्या सुपर ४ मधील शेवटचा सामना भारत-श्रीलंका यांच्यात पार पडला. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने श्रीलंकेचा फिरकीपटू २२ वर्षीय दुनिथ वेलाल्गेची भेट घेतली.

या प्रसंगाचा व्हिडीओ सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या अधिकृत सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे. सूर्यकुमार दुनिथकडे चालत जाताना दिसतो. त्यानंतर तो मोठ्या भावाप्रमाणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे सांत्वन करताना दिसतो. दुनिथच्या छातीवर हात ठेवून सूर्यकुमार त्याच्याशी आपुलकीने बोलत असल्याचे व्हिडीओच दिसते.

काही मिनिटे दुनिथशी संवाद साधल्यानंतर सूर्यकुमार त्याला मिठी मारून प्रोत्साहन देताना दिसतो. दुनिथही सूर्यकुमारच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवतो. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या व्हिडीओला ‘हा क्षण’ एवढेच कॅप्शन दिले आहे. सध्या या व्हिडीओला भावनिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दुनिथ वेलाल्गेने १८ सप्टेंबर रोजी आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात ४ षटकांत १ विकेट घेत ४९ धावा दिल्या. अखेरच्या २०व्या षटकात दुनिथ फारच महागडा ठरला. अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने वादळी फटकेबाजी करत त्याच्या षटकात ५ षटकार लगावले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण त्याच षटकात दुनिथने त्याला झेलबाददेखील केले. या षटकानंतर दुनिथच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

दुनिथला वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तो तात्काळ कोलंबोला परतला. वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर तो पुन्हा सुपर ४ सामन्यांसाठी दुबईत आला. सुपर ४ मधील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यानंतर पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आले.

रोमांचक सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात

दरम्यान भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर ४ मधील अखेरचा सामना रोमांचक असा झाला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिलं होतं. श्रीलंकेने प्रत्युत्तरात पहिल्या षटकात पहिली विकेट गमावली. पण यानंतर पथुम निसांका व कुसल परेरा यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या गोलंदाजांची शाळा घेतली. पथुम निसांकाने यंदाच्या आशिया चषकातील पहिलं शतक झळकावले. निसांकाने ५२ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह १०१ धावा करत शतक झळकावले. तर कुसल परेराने ३२ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली.

शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रोमहर्षक असा झाला. अखेर एक धाव कमी पडल्यामुळे सुपर ओव्हरही झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताने सामना सहज जिंकला.