टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला ९ गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींचा हा शेवटचा सामना होता. दुबईच्या मैदानावर विराटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकात नामिबियाला ८ बाद १३२ धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेत नामिबियाला तंगवले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकत भारताचा विजय सुकर केला. रोहित आक्रमक अर्धशतक ठोकून माघारी परतला. त्यानंतर राहुल-सूर्यकुमारने विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांनी मागील फॉर्म कायम राखत भारतासाठी दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे २४वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. १०व्या षटकात नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने आक्रमक फटके खेळले. १६व्या षटकात राहुलने चौकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५४ तर सूर्यकुमार यादवने ४ चौकारांसह नाबाद २५ धावा केल्या.

हेही वाचा – T20 WC: सेमीफायनल गाठलेल्या इंग्लंडला ‘जबर’ धक्का..! २५० षटकार ठोकलेला खेळाडू गेला स्पर्धेबाहेर

नामिबियाचा डाव

नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी ३३ धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने फिरकीत अडकवले. आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला पायचीत पकडले. बार्डने २१ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने जडेजा-अश्विनने नामिबियाला धक्के दिले. अनुभवी फलंदाज डेव्हिड वीजाने २६ धावांचे योगदानन दिल्यामुळे नामिबियाला शतकी पल्ला ओलांडता आला. नामिबियाने २० षटकात ८ बाद १३२ धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेतले.

Live Updates
17:54 (IST) 8 Nov 2021
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कप्तान), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

नामिबिया – स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, क्रेग विल्यम्स, गेरहार्ड इरास्मस (कप्तान), झेन ग्रीन (यष्टीरक्षक), डेव्हिड वीजा, जॅन फ्रायलिंक, जेजे स्मिट, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड शॉल्ट्झ.

17:53 (IST) 8 Nov 2021
विराट-शास्त्री शेवटच्या वेळेस…

विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासाठी हा सामना खूप खास असेल. टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार नसल्याचे विराटने आधीच जाहीर केले होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री शेवटच्या वेळी टीम इंडियाला मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. या स्पर्धेनंतर त्यांचा कार्यकाळ संपणार असून राहुल द्रविड या पदाची सूत्रे हाती घेणार आहे.