आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ मध्ये आज पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टीने पाकिस्तानसाठी महत्वाच्या असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत १८५ धावा केल्या. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान असणार आहे आणि हे आव्हान पाकिस्तानची गोलंदाजी पाहता फार सोपे असणार नाही.

मोहम्मद रिझवान (४), बाबर आजम (६) व शान मसूद (२) ह्या आघाडीच्या फलंदाजांना वेन पार्नेल, लुंगी एनगिडी व एनरिच नॉर्खिया यांनी माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद हॅरीस व इफ्तिखार यांनी काही काळ डाव सावरला, परंतु हॅरिसच्या (२८) रुपाने पाकिस्तानला ४३ धावांवर चौथा धक्का बसला. नॉर्खियाने ही विकेट मिळवून दिली. मोहम्मद नवाजने २८ धावा केल्या आणि इफ्तिखारसह त्याने ३९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले.

शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. नॉर्खियाने ही जोडी तोडली, परंतु तोपर्यंत पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक केले होते. नॉर्खियाने ४ षटकांत ४१ धावांत ४ गडी बाद केले. इफ्तिखारनेही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. वेन पारनेल, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि तबरेझ शम्सी यांना प्रत्येकी एक गडी करण्यात यश मिळाले.

हेही वाचा :  T20 World Cup 2022: श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धने विश्वविक्रम मोडणाऱ्या कोहलीला म्हणाला, ‘एक योद्धा…’ 

आफ्रिकेला उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी १८६ धावा करायच्या आहेत. पाकिस्तानने आज विजय मिळवल्यास त्यांचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे आणि ते तो जिंकून ६ गुणांची कमाई करू शकतात. पण, त्याचा फार उपयोग होणार नाही.