Team India Record: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेतील ३ पैकी २ सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली आहे. तर एका सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. भारताचा संघ या मालिकेत पिछाडीवर असला तरीदेखील गिलसेनेने या मालिकेत असं काही करून दाखवलं आहे जे याआधी कधीच घडलं नव्हतं.

या मालिकेत भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी ६ वेळेस ३५० पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी केवळ ऑस्ट्रेलियाला असा पराक्रम करता आला होता. ३६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने एकाच मालिकेत ६ वेळेस ३५० पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला होता.

या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ३५८ धावा केल्या. यासह भारतीय संघाने सहाव्यांदा ३५० पेक्षा अधिक धावा केल्या. या सामन्यात भारतीय संघ आणखी एक वेळा फलंदाजीला येईल. यासह पाचव्या कसोटीत भारतीय संघाला २ वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळेल. त्यामुळे भारतीय संघाला या मोठ्या विक्रमात ऑस्ट्रेलियाला मागे सोडण्याची संधी असणार आहे.

या मोठ्या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने ६ वेळेस एकाच मालिकेत ३५० पेक्षा अधिक वेळेस धावा करण्याचा पराक्रम केला होता. ऑस्ट्रेलियाने एकदा नव्हे, तर ३ वेळा हा पराक्रम करून दाखवला आहे. १९२०-२१, १९४८ आणि १९८९ मध्ये झालेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ३५० पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला होता.

आता इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने देखील ६ वेळेस ३५० धावा केल्या आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने दोन्ही डावात ३५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यानंतर एजबस्टन कसोटीतील दोन्ही डावात भारतीय संघाने ३५० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाला ३५० पेक्षा अधिक धावा करता आल्या होत्या. आता चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताने ३५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघ आणखी एक वेळा ३५० पेक्षा धावा करून ऑस्ट्रेलियाचा हा मोठा विक्रम मोडू शकतो.