स्पोर्ट्स फॉर ऑलच्या उपक्रमाचे खेळाडू व प्रशिक्षकांकडून स्वागत

शालेय स्पर्धा म्हटल्या की, डोळय़ासमोर सुविधांची वानवा असलेले चित्र पटकन उभे राहते. खेळण्यासाठी उपलब्ध असलेल्या मैदानांची अवस्था दयनीय तर असतेच, परंतु पायाभूत सुविधांचीही कमतरता अनेकदा पाहायला मिळाली आहे. सदोष पंचगिरी हे तर शालेय स्पध्रेत नित्याचेच झाले आहे. मात्र, क्रीडा क्षेत्राच्या वाढत्या प्रसाराबरोबर यातही हळूहळू का होईना सुधारणा होताना दिसत आहे. ‘स्पोर्ट्स फॉर ऑल’तर्फे कांदिवली येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात आयोजित केलेल्या शालेय मैदानी स्पर्धामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धा दोषमुक्त पार पाडण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धामध्ये पहिल्यांदा फोटो फिनिश, ड्रोनसह १३ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आल्याने खेळाडूंसह पालकांनीही या बदलाचे स्वागत केले आहे.

मुंबई शहर व उपनगर येथे जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे, मुंबई शालेय क्रीडा असोसिएशनतर्फे तसेच विविध जिमखान्यांतर्फे आंतरशालेय स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. मात्र, या स्पर्धाना कुठेही तंत्रज्ञानाची सोबत नसल्याने शालेय स्तरावरील विक्रम हे त्या त्या आयोजकांपुरते मर्यादित राहतात किंवा यातही अनेकदा त्रुटी आढळल्या आहेत. ‘स्पोर्ट्स फॉर ऑल’ने ही परंपरागत चौकट मोडून काढताना भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) येथे आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पध्रेत फोटो फिनिश कॅमेऱ्यासह १३ इतर कॅमेऱ्या व ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला आहे. ‘‘या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही दोषमुक्त निकाल देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच या कॅमेऱ्याच्या साहाय्याने केलेले चित्रण आमच्या संकेतस्थळावर मांडण्यात येते, जेणेकरून प्रत्येक खेळाडूला आपल्या कामगिरीचे विश्लेषण करणे सहज शक्य होणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये अशा तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास खेळाडूंनाही कामगिरी सुधारण्यास मदत मिळू शकेल,’’ असे स्पोर्ट्स फॉर ऑलचे संस्थापक हृषीकेश जोशी यांनी सांगितले; पण याच वेळी तंत्रज्ञानासोबत आपल्या पंचांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मत उपस्थित प्रशिक्षकांनी व्यक्त केले.

मीत पटेलचा विक्रम

मालाडच्या चिल्ड्रन्स अकादमीच्या मीत पटेलने १६ वर्षांखालील गटात उंच उडी प्रकारात १.६७ अंतरासह नवा विक्रम प्रस्थापित केला. मुलींमध्ये निशी पटेलने प्रथम क्रमांक पटकावला. रोहित दंगापुरेने ३००० मीटर शर्यत १०.५६ मिनिटांत पूर्ण केली. निधी विचारेने लांब उडी प्रकारात अव्वल स्थान मिळवले.

मुंबई शालेय क्रीडा असोसिएशन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आंतरशालेय स्पर्धामध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा कधीच वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकदा पंचांच्या सदोष निर्णयाचा फटका खेळाडूंना बसला आहे. त्यामुळे स्पोर्ट्स फॉर ऑलच्या या पुढाकाराचे कौतुक करायला हवे. आर्थिकदृष्टय़ा सर्व शालेय स्पर्धामध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे परवडणारे नसले तरी काळाच्या ओघात हा बदल व्हायला हवा.  प्रमोद रॉड्रिग्ज,चिल्ड्रन्स अकादमी, मालाड