Pillars of India’s Victory Women’s World Cup 2025: नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम हे भारतीय संघासाठी नेहमीच लकी ठरतं, असं कर्णधार हरमनप्रीत कौर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाली. हरमन असं का म्हणाली, हे संपू्र्ण वर्ल्डकप स्पर्धेत आपण पाहिलं. वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत या मैदानावर खेळताना भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. भारताने निर्णायक सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर सेमीफायनलमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केलं. शेवटी अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान कोण आहेत या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार? जाणून घ्या.
१) स्मृती मानधना
अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरूवातीची गरज होती. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी स्मृती आणि शफालीने मिळून शतकी भागीदारी केली. स्मृतीने ५८ चेंडूंचा सामना करत ४५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने ८ चौकार मारले. तिचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. पण भारताला अंतिम सामन्यात जशी सुरूवात हवी होती, तशी सुरूवात मिळाली.
२) शफाली वर्मा
शफाली वर्मा ही भारतीय संघासाठी सरप्राईज पॅकेज ठरली. बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली आणि त्यामुळे सेमीफायनलच्या सामन्यात शफाली वर्माला संघातस स्थान दिलं गेलं. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शफाली वर्माला सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. तिला अवघ्या १० धावा करता आल्या होत्या. पण सेमीफायनलमध्ये तिने ८७ धावांची दमदार खेळी केली. यासह गोलंदाजी करताना २ गडी देखील बाद केले.
३)दीप्ती शर्मा
दीप्ती शर्मा या सामन्याची खरी शिल्पकार ठरली. भारतीय संघ अडचणीत असताना तिने फलंदाजीत ५८ चेंडूंचा सामना करून ५८ धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर तिने भारतीय संघाची धावसंख्या ३०० धावांच्या जवळपास पोहोचवली. त्यानंतर गोलंदाजी करताना तिने ५ गडी बाद केले. यासह ती या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारी गोलंदाज ठरली.
४)रिचा घोष
भारतीय महिला संघातील मधल्या फळीत अशी एक फलंदाज आहे, जी कुठल्याही क्षणी फलंदाजीला येऊन सामना फिरवू शकते. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिचाने याआधीही अनेकदा स्फोटक खेळी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत. या सामन्यात तिने ३ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
५) हरमनप्रीत कौर
हरमनप्रीत कौरला या सामन्यात फलंदाजीत हवं तितकं योगदान देता आलं नाही. पण नेतृत्वात ती कुठेही कमी पडली नाही. तिचा शफाली वर्माला गोलंदाजी देण्याचा निर्णय या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. शफालीने लागोपाठ २ षटकात पहिल्याच चेंडूवर १ विकेट घेऊन भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. यासह ती भारतीय महिला संघाला वर्ल्डकप जिंकून देणारी पहिलीच कर्णधार ठरली.
