आयपीएलनंतर आता मेजर लीग क्रिकेट २०२५ ही स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमधील अटीतटीचा सामना १४ जूनला कॅलिफोर्नियातील ओकलंड कोलिझियम येथे एमआय न्यू यॉर्क आणि टेक्सास सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जने शानदार कामगिरी केली आणि ३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात एक विचित्र रनआउट पाहायला मिळाला. हा खेळाडू होता ट्रेंट बोल्ट, त्याच्या विचित्र रनआऊटचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
एमआय न्यू यॉर्कचा खेळाडू ट्रेंट बोल्टचा हा रनआउट पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. बोल्टची ही विकेट महत्त्वाची होती कारण त्यावेळी त्याचा संघ खूप चांगल्या स्थितीत होता पण तो बाद होताच टेक्सास सुपर किंग्जने सामन्यावर ताबा मिळवला.
एमआय न्यू यॉर्कच्या डावाच्या १९ व्या षटकात, अॅडम मिल्नेने तजिंदर ढिल्लॉनला चेंडू टाकला जो त्याने उत्कृष्टपणे खेळला. एमआय न्यू यॉर्कच्या दोन्ही खेळाडूंनी एक धाव चांगली घेतली पण बोल्ट दुसरी धाव घेण्यासाठी धावताच ढिल्लॉनने त्याला नकार दिला. तितक्यात क्रीजच्या अगदी जवळ असतानाही बोल्ट क्रीजच्या आत वेळेत पोहोचला नाही आणि धावबाद झाला.
बोल्टने एक धाव पूर्ण करताच त्याची बॅट हातातून पडली, तरीही तो दुसरी धाव घेण्यासाठी निघाला, समोरून नकार येताच बोल्ट चेंडूकडे पाहत परत जागेवर गेला. क्रीजच्या आतमध्ये उडी मारून तो पुन्हा बाहेर आला आणि पडला. क्रीजबाहेर पडल्यानंतर आतमध्ये जाण्यापूर्वी यष्टीरक्षकाने त्रिफळा उडवला होता. बोल्टचा तळ्यात मळ्यात खेळ करता करता रनआऊट झालेला पाहून सर्वच जण पाहतच राहिले की नेमकं काय झालं.
बोल्ट बाद झाला तेव्हा एमआय न्यू यॉर्कला ९ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती. एमआय न्यू यॉर्क सामन्यात पुनरागमन करू शकला नाही आणि टेक्सास सुपर किंग्जने सामना सहज जिंकला. या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. संघाकडून सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेने ४४ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांसह ६५ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्याशिवाय, केल्विन सॅव्हेजने ३४ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांसह ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या एमआय न्यू यॉर्क संघाला २० षटकांत ८ गडी गमावून फक्त १८२ धावा करता आल्या. संघाकडून मोनक पटेलने ६२ धावांची खेळी केली तर अनुभवी खेळाडू कायरन पोलार्डने ३२ धावा केल्या. मायकेल ब्रेसवेलनेही फलंदाजीत आपली छाप पाडली आणि ३८ धावांची शानदार खेळी केली. पण तोही त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सुपर किंग्जकडून अॅडम मिल्नेने चार षटकांत २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या तर नूर अहमद आणि मोहसिन खान यांनी १-१ विकेट्स घेतल्या.