उत्तर प्रदेश विझार्ड्स संघाने मुंबई मॅजिशियन्सला २-० असे पराभूत करीत हॉकी इंडिया लीग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. या पराभवामुळे मुंबईचे उपांत्य फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.
मेजर ध्यानचंद अ‍ॅस्ट्रोटर्फ स्टेडियमवर झालेल्या या लढतीत उत्तरप्रदेशने बाजी मारली तरी या सामन्यात मुंबईच्या आक्रमक फळीने सातत्यपूर्ण चाली केल्या. तथापि पेनल्टी कॉर्नरसह त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. उत्तर प्रदेश संघाकडून एम. परदीप याने नवव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. ५८व्या मिनिटाला उत्तर प्रदेशच्या तुषार खंडकरने मारलेला फटका मुंबईच्या गोलरक्षकाने परतविला तथापि सिद्धार्थ शंकरने शिताफीने चाल करीत चेंडू गोलजाळ्यात तटविला. या विजयासह उत्तर प्रदेशचे २२ गुण झाले आहेत. मुंबईचे १४ गुण असून साखळी गटात ते शेवटच्या क्रमांकावर आहेत.
नवव्या मिनिटाला उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी जोरदार चाल केली. परदीप याने चेंडूवर ताबा मिळविला व त्याने मुंबईचा गोलरक्षक श्रीजेशला चकवित गोल मारला. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या.