आशिया चषक २०२५ येत्या ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार असून दोन गटांत संघांची विभागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानने सर्वात आधी आशिया चषकासाठी संघ जाहीर केला आहे. तर भारताचा संघ १९ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान माजी खेळाडूने वैभव सूर्यवंशीला संघात सामील केलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

भारताच्या टी-२० संघात कोणाला संधी मिळणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. एका जागेसाठी ३ खेळाडू दावेदार आहेत. याशिवाय शुबमन गिल, श्रेयस अय्यर या खेळाडूंना संघात संधी मिळणार का अशा चर्चा सुरू आहेत. टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार आणि कोणाला संघाबाहेर जावं लागणार यावर हे पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहेत. पण यादरम्यान भारताचे माजी कर्णधार आणि खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी वैभव सूर्यवंशीला आशिया चषक संघात संधी द्यावी असं वक्तव्य केलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या तयारासीठी त्याचा संघात आताच समावेश करावा असा आग्रह त्यांनी धरला आहे.

माजी खेळाडूची वैभव सूर्यवंशीची टी-२० विश्वचषकात निवड करण्याची मागणी

कृष्णाचारी श्रीकांत यांच्या नेतृत्त्वात सचिन तेंडुलकरने १९८९ मध्ये पाकिस्तानविरूद्ध वयाच्या १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कृष्णाचारी श्रीकांत म्हणाले, “इंग्लंडविरूद्ध शॉर्ट बॉल खेळताना संजू सॅमसनला अडचणी येत होत्या. त्यामुळे तो सलामीला उतरू शकेल याबाबत शंका आहे. जर मी निवडकर्ता असतो, तर माझा पहिला पर्याय अभिषेक शर्मा असता. दुसऱ्या क्रमांकावर मी वैभव सूर्यवंशी किंवा साई सुदर्शनला पसंती दिली असती. वैभव सूर्यवंशीला मी १५ जणांच्या टी-२० विश्वचषक संघात नक्की स्थान दिलं असतं. तो सध्या अप्रतिम खेळतो आहे.”

आशिया कपसाठी भारतीय संघ निवडणं निवडकर्त्यांसाठी सोपं असणार नाही. अनेक खेळाडू टॉप ऑर्डरसाठी शर्यतीत आहेत. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि तिलक वर्मा यांच्यात चढाओढ सुरू आहे. याशिवाय साई सुदर्शन देखील या शर्यतीत आहे.

आयपीएल २०२५ मध्ये वैभव सूर्यवंशीने स्वतःला सिद्ध केलं. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करताना अनेक वादळी खेळी केल्या. राजस्थान रॉयल्सने लिलावात त्याच्यावर १ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. सलामीवीर आणि कर्णधार संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर वैभवला खेळण्याची संधी मिळाली. वैभवने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. वैभवने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.