नवी दिल्ली : भारताच्या मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजाराने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. धैर्यशील आणि लवचीक क्रिकेट कारकीर्दीची अखेर अशी भावना क्रिकेट वर्तुळातून उमटून गेली.
‘‘वादळ आले तेव्हा तो उभा राहिला. आशा मावळत असताना तो लढला,’’ अशी भावना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केली. भारताचे माजी फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी पुजाराच्या कारकीर्दीचा गौरव करताना २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गॅबा मैदानावर त्याने ऑस्ट्रेलियाच्या शरीरवेधी गोलंदाजीचा केलेल्या क्षणाची आठवण करून दिली. ‘‘पुजाराच्या फलंदाजीत धाडस, धैर्य, दृढनिश्चय वेगळेच होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध गॅबा मैदानावर पुजाराने जी काही फलंदाजी केली ती बघितली, तर क्रिकेटपटू कसा असावा याची कल्पना येते. त्याची खेळ आणि संघाप्रति समर्पित भावना कौतुकास्पद होती,’’ असे लक्ष्मण म्हणाला.
पुजाराच्या कारकीर्दीत भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या अनिल कुंबळे यांनी त्याला क्रिकेटचा खरा राजदूत म्हणून संबोधले. ‘‘तुझा खेळ नेहमी आनंद देणारा आणि अद्भुत होता. क्रिकेट खेळाचा तू उत्तम राजदूत होतास. आयुष्याच्या दुसऱ्या खेळीतही असाच यशस्वी हो,’’ अशा शब्दांत अनिल कुंबळेने पुजाराचे कौतुक केले.
द्रविडनंतर पुजाराचा मधल्या फळीत साथीदार राहिलेला आणि ऑस्ट्रेलियात नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेनेदेखील पुजाराचे कौतुक केले. ‘‘तुझ्यासोबत खेळलेला प्रत्येक क्षण हा आठवणीच्या कप्प्यात कायम राहील,’’ असे रहाणे म्हणाला.
पुजारा म्हणजे कसोटी क्रिकेटचे मूर्तिमंत उदाहरण मानता येईल. त्याची कारकीर्द चिकाटी आणि नि:स्वार्थीपणाची होती. गोलंदाजांना निराश करण्याची क्षमता त्याच्याकडे अफाट होती. यामुळेच तो भारतीय संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ बनून राहिला. पारंपरिक मूल्यांशी प्रामाणिक राहूनही सर्वोच्च स्तरावर यश मिळवता येते हेच त्याने आपल्या कारकीर्दीत दाखवून दिले. भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजित सैकिया म्हणाले.
‘‘पुजाराच्या खेळातील जिद्द आणि दृढनिश्चत कायम प्रेरणादायी राहतील. जे साध्य केले याचा तुम्हाला अभिमान वाटणे सहाजिक आहे आणि या अभिमानासाठी तू पात्र आहे, अशी भावना सेहवागने व्यक्त केली, तर पुजाराचे नाव घेतले की आधी जिद्दच समोर येते. त्याच्या बचावातदेखील एक प्रकारची आक्रमकता होती,’’ असे इरफान पठाण म्हणाला.