जळगावचा विजय चौधरी याने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याने पुण्याच्या अभिजित कटकेला पराभवाची धूळ चारली. गुणांच्या जोरावर विजयने अभिजितवर मात केली. अनुभवासमोर ताकद कमी पडल्याचा प्रत्यय या लढतीने दिला. अभिजितने स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला परंतु विजयने त्याला संधीच दिली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील वारजे येथे महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आवर्जुन उपस्थित दर्शवली होती.

६ फूट १ इंच इतकी उंची असलेला २१ वर्षीय अभिजित हा विजयला भारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु विजयने आपला अनुभव पणाला लावला. दोन्ही मल्लांचे वजन ११८ किलो इतके होते. विजयने यापूर्वी २०१४, २०१५ मध्ये जेतेपद पटकावले होते. नरसिंग यादव नंतर महाराष्ट्र केसरीची गदा सलग तीन वेळा मिळवणारा विजय दुसरा मल्ल ठरला.

निळ्या पोषाखात विजय व लाल पोषाखात अभिजित यांनी सुरूवातीला एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. त्यानंतर विजयने आक्रमकता दाखवत पहिला गुण वसूल केला. त्याने पट काढण्याचाही प्रयत्न केला. पहिला गुण पटकावल्यामुळे आत्मविश्वास आलेल्या विजयने आणखी आक्रमक होत दुसरा गुण पटकावत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. विजय हा मातीवरचा मल्ल आहे. पण त्याने मॅटवरही उल्लेखनीय कामगिरी केली. हॅटट्रिक विजेतेपदाचा त्याच्यावर दबाव होता. या दबावाला तो कसा सामोरा जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay choudhary wins maharashtra kesari beat abhijeet katke