विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांसाठी आजचा दिवस आनंदाने ठरला आहे. महाराष्ट्राने बंगालवर मात केल्यानंतर मुंबई आणि विदर्भाच्या संघाने आपल्या पहिल्या फेरीत विजय मिळवला. मुंबईने पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशवर तर विदर्भाने झारखंडचा पराभव केला.
अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!
मुंबईने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. अखिल हेरवाडकर आणि जय बिस्ता यांनी पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी केली. सलामीवीर जय बिस्ताचं शतक मात्र अवघ्या १० धावांनी हुकलं. हरप्रीत सिंहच्या फेकीवर जय बिस्ता ९० धावांवर धावबाद झाला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने ८५ चेंडूत १३४ धावांची आक्रमक खेळी करत मुंबईला ३३२ धावांपर्यंत मजल मारुन दिली. मध्य प्रदेशकडून आवेश खानने २ बळी मिळवले.
अवश्य वाचा – विजय हजारे करंडक : महाराष्ट्राची बंगालवर मात, कर्णधार राहुल त्रिपाठीची शतकी खेळी
प्रत्युत्तरादाखल मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी आपल्या डावाची संयमी सुरुवात केली. मात्र मध्य प्रदेशचा एकही फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये यशस्वी ठरला नाही. ठराविक अंतराने मध्य प्रदेशचे फलंदाज माघारी परतत राहिले, ज्याचा फायदा मुंबईला झालेला पहायला मिळाला. मध्य प्रदेशकडून अंशुल त्रिपाठीने ६७ धावांची खेळी केली. मुंबईकडून शम्स मुलानीने ४ तर ध्रुवील मतकरने ३ बळी घेतले.
दुसरीकडे रणजी करंडक विजेच्या विदर्भाने अटीतटीच्या लढतीत विदर्भावर ७ धावांनी मात केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाच्या संघाने ४९ षटकांत ३०० धावांपर्यंत मजल मारली. विदर्भाकडून फलंदाजीमध्ये जितेश शर्मा, संजय रामास्वामी आणि अपुर्व वानखेडे यांनी अर्धशतकी खेळी करुन संघाला ३०० धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्वाचा हातभार लावला. झारखंडकडून राहुल शुक्लाने ४ बळी घेतले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना झारखंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. नझिम सिद्दकी उमेश यादवच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर ठराविकत अंतराने झारखंडचे ३ गडी माघारी परतल्याने विदर्भाची सामन्यात सरशी होणार असं चित्र दिसत होतं. मात्र कर्णधार इशान किशन आणि सौरभ तिवारीने चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचत सामन्यात झारखंडची बाजू मजबूत केली. मात्र कर्ण शर्माने सौरभ तिवारीचा अडसर दूर केल्यानंतर झारखंडची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. झारखंडच्या कुमार देबोब्रत आणि विकाश सिंह या तळातल्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करुन अर्धशतकी खेळी केली. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अखेर अपयशीच ठरले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई ३३२/५, सूर्यकुमार यादव १३४ नाबाद, जय बिस्ता ९०. आवेश खान २/६२ विरुद्ध मध्य प्रदेश अंशुल त्रिपाठी ६७, पुनीत दाते ४३. शम्स मुलानी ४/६२, ध्रुवील मतकर ३/५० निकाल – मुंबई ७४ धावांनी विजयी
संक्षिप्त धावफलक : विदर्भ सर्वबाद ३००, जितेश शर्मा ७९, संजय रामस्वामी ७७, अपूर्व वानखेडे ५१. राहुल शुक्ला ४/५२, अतुल सुरवर २/५२ विरुद्ध झारखंड २९३/७, सौरभ तिवारी ६५, कुमार देबोब्रत ६०. यश ठाकूर २/४५, रजनीश गुरबानी २/५२ निकाल – विदर्भ ७ धावांनी विजयी