Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याची प्रकृती बिघडली आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २१ डिसेंबरला ठाण्याजवळच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीची काळजी घेत आहेत. पुढील पाच ते सहा दिवसांत त्याला बरं वाटेल, त्याला फिजिओ थेरेपीची जास्त गरज आहे त्यामुळे आमचा भर त्यावर आहे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. विनोद कांबळीने सचिनला एक निरोप दिला आहे तसंच मी मरणार नाही असंही त्याने म्हटलं आहे.
विनोद कांबळीला काय झालं आहे?
भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला दोन दिवसांपूर्वी चक्कर आली आणि तो पडला. त्यानंतर तपासणी केली असता त्याला कावीळ झाल्याचं आणि व्हायरल इनफेक्शन झाल्याचं समजलं. तसंच विनोद कांबळीच्या मेंदूलाही काही प्रमाणात सूज आली आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून विनोदवर ठाण्याजवळच्या कशेळी असलेल्या आकृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हे पण वाचा- Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
विनोद कांबळीचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल
विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी सचिन आणि विनोद कांबळी एकत्र आले होते. दोघेही एकाच मंचावर होते. मात्र ज्या मैदानावर विनोदची बॅट तळपायची त्या ठिकाणी त्याला व्हिल चेअरवर आलेलं पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.विनोदचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक माजी भारतीय खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले. दरम्यान विनोद कांबळी यांनी एक मुलाखतही दिली होती, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. आता आकृती रुग्णालयातून सचिन तेंडुलकरला विनोदने एक खास निरोप दिला आहे.
काय म्हटलं आहे विनोद कांबळीने?
मी देवाच्या कृपेने वाचलो आहे, कविता नावाच्या मुलीचा हात धरत विनोद म्हणाला या मुलीने माझी काळजी घेतली. तिने मला सांभाळून घेतलं. सचिनला माझा निरोप द्या, माझ्यामध्ये ताकद आहे अजून. माझी ताकद अजून देवामुळे आणि आचरेकर सरांमुळे आहे. मला या रुग्णालयात आणल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी कमबॅक करणार, सचिनला निरोप द्या मी १० वेळा कमबॅक केलं आहे आता ११ व्यांना जोमाने एंट्री करणार असं विनोद कांबळीने सांगितलं आहे. “डॉक्टर माझ्यासाठी देव आहेत, मरणाच्या दारातून मी आलो आहे, मी पुन्हा उभा राहील आणि पुन्हा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसेल, मी अजून मेलो नाही,जिवंत आहे आणि मरणारही नाही, मी सचिन तेंडुलकर सोबत पुन्हा क्रिकेट खेळताना दिसेन, सचिन तेंडुलकरला देखील माझा हाच निरोप आहे,” असं विनोद कांबळी म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd