Virat Kohli First Reaction on Test Retirement: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रनमशीन असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर करत सर्वांच चाहत्यांना धक्का दिला. भारत-इंग्लंड कसोटी सामना सुरू असला तरी विराट कोहलीच्या अनुपस्थितीबाबत आणि त्याची चर्चा कायमच सुरू असते. यादरम्यान आता विराट कोहलीने त्याच्या कसोटी निवृत्तीनंतर तब्बल दोन महिन्यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे.
लंडनमध्ये युवीकॅन फाउंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विराट कोहलीसाठी अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. ज्यात सध्याचा भारतीय कसोटी संघही उपस्थित होता. कोहलीने दाढीच्या रंगाचा संदर्भ देऊन असं सूचित केले की त्याच्या गौरवशाली कसोटी कारकिर्दीचा शेवट करण्याची वेळ आली.
युवराज सिंगच्या युवीकॅन फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरव कपूर करत होता. यादरम्यान ख्रिस गेल, डॅरेन गफ, केविन पीटरस, युवराज सिंग, रवी शास्त्री, युवराज सिंगसह विराट कोहलीला देखील स्टेजवर बोलावण्यात आलं. विराट कोहली यादरम्यान स्टेजवर बोलताना म्हणाला, “मी आता दोन दिवसांपूर्वीच माझी दाढी रंगवली. पिकलेल्या दाढीचे केस रंगवण्याची सारखी वेळ येते तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की निरोपाची वेळ झाली आहे.”
१२ मे रोजी कोहलीने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या पोस्टमध्ये विराटने लिहिलं, “टीम इंडियाची कसोटी कॅप परिधान करून मला १४ वर्ष झाली. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा पाहिली, मला घडवलं आणि आयुष्यभरासाठी शिदोरी दिली. टीम इंडियासाठी कसोटी खेळणं हे माझ्यासाठी नेहमीच खास होतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. कृतज्ञ भावनेने भरलेल्या हृदयानं मी कसोटीचा प्रवास थांबवतोय.”
विराट कोहली हा कसोटी कारकिर्दीतील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. विराटने २०११ मध्ये वेस्टइंडिज दौऱ्याहून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये १२३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान २१० डावात फलंदाजी करताना त्याने ४६.९ च्या शानदार सरासरीने ९२३० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३० शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली. यादरम्यान नाबाद २५४ धावा ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.