Virat Kohli Special Post for Shubman Gill: भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलने वादळी कामगिरी करत अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात शतक केलं. यानंतर गिलने दुसऱ्या कसोटी सामन्यातही आपला फॉर्म कायम ठेवला. गिलने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात द्विशतक झळकावत विक्रमी २६९ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने शतक करत १६० धावा केल्या. गिलने त्याच्या विक्रमी खेळीदरम्यान विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे. गिलच्या या ऐतिहासिक खेळीसाठी विराट कोहलीने खास पोस्ट शेअर केली आहे.

शुबमन गिलने अनेक मोठमोठे विक्रम या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या नावे केले आहेत. शुबमन गिल हा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणारा कसोटी कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये द्विशतक करणाराही तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शुबमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वात मोठी धावसंख्या करणारा भारतीय कर्णधार ठरला. याआधी ही कामगिरी विराट कोहलीच्या नावे होती.

शुबमन गिलने एजबेस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात १५० अधिक धावा करत अजून काही अनोखे विक्रम आपल्या नावे केले आहेत. शुबमन गिलने दोन्ही डावात मिळून एकूण ४३० धावा केल्या आहेत. एका सामन्यात गिलने सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. शुबमन गिलने आपल्या अद्वितीय कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भारताचा माजी कसोटी कर्णधार आणि विराट कोहलीही गिलची ही कामगिरी पाहून त्याचं कौतुक करण्यासाठी पुढे सरसावला.

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत शुबमन गिलचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये गिलच द्विशतकानंतर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या वर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “स्टार बॉय तू कमाल खेळलास. नव्याने इतिहास लिहितो आहेस. आता तुझी वाटचाल अशीच दमदार आगेकूच करणारी असेल. तू या सगळ्याचा हकदार आहेस.”

विराट कोहलीची शुबमन गिलसाठी खास पोस्ट

शुबमन गिलने मोडला विराट कोहलीचा विक्रम

विराट कोहलीने २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये तीन शतकं झळकावली. कोहलीप्रमाणेच, सुमारे ११ वर्षांनी युवा कर्णधार म्हणून भारताच्या कसोटी संघाची सूत्र हाती घेतलेल्या गिलनेही विदेशी भूमीवर आपल्या कर्णधारपदाची सुरुवात केली आणि पहिल्या २ सामन्यात ३ शतकं झळकावली. गिलने कोहलीचे विक्रमही मोडले. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या मालिकेत कोहलीने ४४९ धावा केल्या होत्या, तर गिलने फक्त २ सामन्यात ५८५ धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर गिल आता इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून कोहलीचा सर्वाधिक ५९२ धावांचा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे.