India vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ वे शतक ठरले. त्याने सचिन तेंडुलकरच्या ४९ शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराट कोहलीने आपल्या २७७व्या डावात ही कामगिरी केली. सचिनने आपल्या ४५२ व्या डावात ४९ शतके झळकावली होती. विराट कोहलीने त्याच्या ३५व्या वाढदिवसादिवशी ही कामगिरी केली आहे. शतकी खेळीनंतर कोहलीने हे शतक अतिशय खास असल्याचे सांगितले. कोहली म्हणाला यापेक्षा मोठा क्षण कोणता असू शकतो?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या. भारताच्या या धावसंख्येमध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या भागीदारीने महत्त्वाची भूमिका बजावली. कोहली आणि अय्यर यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी झाली. यानंतर श्रेयस अय्यर बाद झाला.
आपल्या वाढदिवशी शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीने डाव संपल्यानंतर सांगितले की, जेव्हा तो श्रेयससोबत भागीदारी करत होता तेव्हा त्याच्या मनात हार्दिक पांड्याचा विचार आला होता आणि कोहलीने याचे कारण सांगितले आहे. डाव संपल्यानंतर विराट म्हणाला की, “अय्यर आणि माझी रणनीती डावाला खोलवर नेण्याची होती, कारण आम्हाला माहित होते की हार्दिक संघात नाही. अशा परिस्थितीत १-२ विकेट पडल्या तर ते आम्हाला अडचणीत आणेल.”

या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते – कोहली

सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितले की, “या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते, परंतु रोहित आणि गिलने चांगली सुरुवात करुन दिली आणि त्याचा आम्हाला फायदा झाला. ती सुरुवात पुढे नेणे हे अय्यर आणि माझे काम होते.१०व्या षटकानंतर चेंडू फिरू लागला होता. संघ व्यवस्थापनाने मला सांगितले होते की, आम्हाला डाव खोलवर घेऊन जायचा आहे आणि शेवटी काही धावा कराव्या लागतील. आशिया चषकादरम्यान अय्यर आणि माझ्यात खूप संभाषण झाले, त्यामुळे डाव पुढे नेणे सोपे झाले.”

हेही वाचा – IND vs SA: विराट विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा ठरला तिसरा फलंदाज, सचिनच्या विक्रमापासून ‘इतक्या’ धावा दूर

यापेक्षा मोठा क्षण कोणता असू शकतो – विराट कोहली

विराट कोहली म्हणाला, ”आम्ही दोघांनी सामन्याच्या परिस्थितीनुसार चांगला खेळ केला. माझ्या वाढदिवशी मी माझे ४९ वे शतक झळकावू शकलो, यापेक्षा मोठा क्षण कोणता असू शकतो? मी लहान असताना हे स्वप्न पाहायचो. आमच्याकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे. त्यामुळे आम्ही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू, खेळपट्टी सतत संथ होत आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli says what could be a bigger moment than scoring my 49th century on my birthday vbm