Virat Kohli Video IND vs ENG 2nd ODI: भारताने इंग्लंडविरूद्ध दुसरा वनडे सामना जिंकत वनडे मालिकेत विजय नोंदवला. रोहित शर्माच्या पुनरागमनाने सर्वच भारतीय चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माने केलेली ११९ धावांची खेळी टीम इंडियासाठी अगदी महत्त्वपूर्ण ठरली आहे. पण विराट कोहली मात्र पुन्हा एकदा फेल झाला. मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला असला तरी विराटने मैदानावर मात्र मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना सीमारेषेजवळ होता. जिथे त्याने दोन कमालीचे झेलही टिपले. विराट सीमारेषेजवळ असताना त्याने तिथे असलेल्या बॉल बॉयशी हात मिळवला आणि विराटने स्वत: हात मिळवल्याचे पाहून त्या बॉल बॉयच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती, ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

विराट कोहली पुढील चेंडू टाकण्याआधी पुन्हा आपल्या जागेवर जात असताना सीमारेषेच्या पलीकडे दोन बॉल बॉय बसले होते, ज्यांनी विराटला पाहून हात पुढे केला आणि विराटनेही लगेच दोघांना हात मिळवला. त्या दुसऱ्या मुलाने लगेच येस्स म्हणत आनंद साजरा केला आणि छातीवर हात ठेवत आश्चर्य आणि आनंद व्यक्त केला. त्याला विश्वासच बसत नव्हता की तो नुकताच जगातील एक प्रसिद्ध क्रिकेटपटूला प्रत्यक्षात इतकं जवळ बघून त्याला हात मिळवून आला आहे.

विराट कोहली यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याने गस एटकिन्सन आणि जो रूट यांचे महत्त्वपूर्ण झेल टिपले. उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे कोहली नागपूरमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी श्रेयस अय्यर मैदानात उतरला होता, ज्याने ३० चेंडूत मॅचविनिंग अर्धशतक झळकावले. पण कटकमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने यशस्वी जैस्वालच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले.

विराट कोहलीही रोहित शर्माप्रमाणे फॉर्मच्या शोधात आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहली चमकदार कामगिरी करू शकला नाही. पर्थमधील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले पण पुढील सर्वा डावांमध्ये तो फेल ठरला. कोहली ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर सातत्याने झेलबाद झाला. तो दिल्लीच्या रणजी ट्रॉफी सामन्यात रेल्वेविरुद्ध खेळण्यासाठी परतला, पण वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याला स्वस्तात बाद केले. तर दुसऱ्या वनडे सामन्यातही कोहली एका षटकारासह ५ धावा करून झेलबाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli shakes hand with ball boy in ind vs eng cuttack odi boy left awestruck video viral bdg