Virat Kohli Retirement BCCI: भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. सकाळी ११ वाजता इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत विराट म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा बॅगी ब्लू जर्सी घातली होती त्याला १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, क्रिकेटचा हा फॉरमॅट मला किती मोठ्या पल्ल्यावर घेऊन जाईल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि मला असे धडे शिकवले जे आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.”
विराटने निवृत्तीबात घोषणा केल्यानंतर काही वेळातच बीसीसीआयने एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून त्याच्या योगदानासाठी आभार मानले आहेत. आपल्या पोस्टमध्ये बीसीसीआयने म्हटले की, “धन्यवाद विराट कोहली! कसोटी क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला आहे, पण त्याचा वारसा कायम राहील. टीम इंडियाचा माजी कर्णधार कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. संघातील त्यांचे योगदान कायम लक्षात राहील.”
७१ वर्षांनी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजय
दुसऱ्या एका पोस्टमध्ये बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाचेही कौतुक केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, “विराट कोहलीने त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१८-१९ च्या हंगामात भारताला ऑस्ट्रेलियावर २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला कसोटी मालिका विजय होता आणि ७१ वर्षांनी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका विजयाची प्रतीक्षा संपली होती. ही एक उल्लेखनीय कामगिरी होती.”
भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकणार कर्णधार
दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, त्याने ६८ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या आक्रमक नेतृत्वाखाली भारताने ४० कसोटी सामने जिंकले आहे. हे कोणत्याही भारतीय कसोटी कर्णधाराने जिंकलेले सर्वाधिक सामने आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली, भारत कसोटी क्रिकेटमध्ये सलग ४२ महिने अव्वल क्रमांकावर होता. याचबरोबर
मायदेशात, भारत त्यांच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी मालिका हरला नाही. त्याने नेतृत्व केलेल्या ११ पैकी १० मालिका भारताने जिंकल्या आहेत.