Virat Kohli Gesture Wins Hearts Video: विराट कोहली आणि रोहित शर्माच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात विजय मिळवला. यासह भारताने ऑस्ट्रेलियावर ९ विकेट्सने विजय मिळवला. यादरम्यान कोहलीने त्याचं ७५ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावलं. सामना संपल्यानंतर, त्याने पॅव्हेलियनमध्ये परतताना असं काही केलं की त्याच्या कृतीने सर्वांचं मनं जिंकलं, ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.
विराटने ८१ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ७४ धावा केल्या आणि रिकी पॉन्टिंगचा एक मोठा विक्रम मोडला. कोहली सचिन तेंडुलकरनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला. भारताने सिडनी एकदिवसीय सामना ९ विकेट्सने जिंकला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिली एकदिवसीय मालिका जिंकता आली नाही.
विराट कोहली आणि रोहित शर्मा संघाला विजय मिळवून देत नाबाद परतले. विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची रवी शास्त्री-एडम गिलक्रिस्ट यांनी मुलाखत घेतली. रोहित-विराटने त्याच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचे आणि तेथील चाहत्यांचे आभार मानले. यानंतर रो-को पॅव्हेलियनच्या दिशेने परतले.
सामना संपल्यानंतर पॅव्हेलियनकडे रोहित-विराट जात होते. विराट पुढे होता आणि चाहते दोघांनाही पाहून एकच जल्लोष करत होते. पुढे जात असलेल्या कोहलीला समोर भारताचा ध्वज पडलेला दिसला. गॅलरीत चाहत्यांनी धरलेल्या ध्वजांपैकी एक खाली पडला होता. त्यावेळी विराट पुढे चालत होता. त्याने झेंडा उचलला आणि चाहत्याच्या पुन्हा दिला. कोहलीने तिथे उपस्थित असलेल्या सर्व चाहत्यांची मनं जिंकली. त्यांनी एकच टाळ्या वाजवात विराटचं कौतुक केलं.
विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला होता. यानंतर विराट कोहली वनडेमधून निवृत्ती घेतो की काय, अशी भिती चाहत्यांच्या मनात होती. विराट कोहली तिसऱ्या सामन्यात फलंदाजीला उतरला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत खातं उघडलं. विराटने पहिली धाव घेताच चाहत्यांनी मैदानावर एकच जल्लोष केला आणि त्याचं कौतुक केलं. तर विराट कोहलीनेही रोहितकडे पाहत येस्स म्हणत खातं उघडल्याचा आनंद साजरा केला.
