How drop in pitches are made : आयपीएलच्या १७व्या हंगामाच्या समाप्तीनंतर आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवली जाणार आहे. यंदा प्रथमच अमेरिकेत आयसीसी स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी तेथे नवीन स्टेडियम बांधले जात आहे. अशा परिस्थितीत कमी वेळात खेळपट्टी तयार करण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ‘ड्रॉप इन पिचेस’ वापरण्यात येणार आहे. या मैदानावर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. याशिवाय टीम इंडिया आणखी दोन सामने खेळणार आहे. ‘ड्रॉप इन पिचेस’ म्हणजे काय जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लोरिडामध्ये तयार झाली ‘ड्रॉप इन पिचेस’ –

फ्लोरिडाहून ‘ड्रॉप इन पिचेस’ न्यूयॉर्कला आणले जात आहेत. भारताच्या तीन सामन्यांसह एकूण आठ सामने येथे खेळवले जाणार आहेत. या मैदानावर भारताचा गट फेरीतील पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. येथे ९ जूनला पाकिस्तानविरुद्ध तर १२ जूनला अमेरिकेविरुद्ध सामना होणार आहे. भारत गट फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये खेळणार आहे.

कशा असतात ‘ड्रॉप इन पिचेस’?

‘ड्रॉप इन पिच’ ही खेळपट्टी मैदान किंवा ठिकाणापासून दूर कुठेतरी बनवली जाते आणि नंतर स्टेडियममध्ये आणली जाते आणि तिथे सेट केली जाते. डिसेंबरपासून फ्लोरिडामध्ये दहा ‘ड्रॉप-इन पिच’ म्हणजे खेळपट्ट्या बनवल्या जात होत्या. या खेळपट्ट्या ॲडलेड ओव्हल टर्फ सोल्युशन्सच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या जात आहेत, ज्याचे नेतृत्व ॲडलेड ओव्हलचे मुख्य क्युरेटर डॅमियर हॉग करत आहेत. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, नासाऊ स्टेडियममध्ये चार खेळपट्ट्या सेट केल्या जातील, तर सहा जवळच्या सराव संकुलात बसवल्या जातील.

हेही वाचा – IPL 2024 : विजयी पुनरागमनाचा हैदराबादचा प्रयत्न; लयीत असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज आव्हान; हेड, अभिषेककडून अपेक्षा

ॲडलेडमध्ये ‘ड्रॉप इन पिच’चा वापर केला जातो –

खेळपट्टीच्या देखभालीसाठी ॲडलेड ओव्हल टर्फ सोल्यूशन्स संघ स्पर्धेदरम्यान न्यूयॉर्कमध्येच राहील. ऑस्ट्रेलियातील ॲडलेड ओव्हल आणि न्यूझीलंडमधील ईडन पार्कसह जगभरातील अनेक मैदानांवर ‘ड्रॉप-इन पिच’ खेळपट्ट्या वापरल्या जातात. फ्लोरिडामध्ये तयार झाल्यानंतर, २० पेक्षा जास्त सेमी-ट्रेलर ट्रकच्या ताफ्याच्या माध्यमातून या खेळपट्ट्या रस्त्याने न्यूयॉर्कला नेण्यात आल्या. न्यूयॉर्क यँकीज आणि न्यूयॉर्क मेट्स, तसेच इंटर मियामी फुटबॉल क्लबसह त्यांच्या स्टेडियम आणि प्रशिक्षण क्षेत्रांवर काम केलेल्या लँडटेकने गेल्या आठवड्यात आउटफिल्डची पायाभरणी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly are the drop in pitches used in the ind vs pak match in new york during the icc t20 world cup 2024 vbm