पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यानंतर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टीची मागणी केली होती. आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. मागणी मान्य न झाल्यास पाकिस्तानने बहिष्काराचा इशारा दिला होता. पाकिस्तान-युएई सामना होणार का याविषयी साशंकता होती. मात्र आयसीसीने पायक्रॉफ्ट यांच्या बाजूने कौल दिला. पायक्रॉफ्टच युएईविरुद्धच्या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील.
झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू असलेल्या पायक्रॉफ्ट यांनी ३ टेस्ट आणि २० वनडेत संघाचं प्रतिनिधित्व केलं. १९९२ मध्ये त्यांनी भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्या सामन्यात त्यांनी ३९ आणि ४६ धावांचं योगदान दिलं होतं. शेन वॉर्न आणि स्टीव वॉ यांचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलिया ब संघाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. १९८३ वर्ल्डकप स्पर्धेत ज्या लढतीत कपिल देव यांनी १७५ धावांची झुंजार खेळी केली होती त्या सामन्यात पायक्रॉफ्ट झिम्बाब्वे संघाचा भाग होते.
खेळातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर पायक्रॉफ्ट यांनी झिम्बाब्वे U19 संघाचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यानंतर ते निवडसमिती सदस्य होते. यानंतर त्यांनी झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी हाताळली. यानंतर ते सामनाधिकारी या भूमिकेत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या अनुभवी सामनाधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. शंभरहून अधिक कसोटी सामन्यात सामनाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत पायक्रॉफ्ट सामनाधिकारी होते.
पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला.
हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती असा आरोप नक्वी यांनी केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तान युएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचे संकेत दिले होते. मात्र आता हा सामना होत आहे.
अँडी पायक्रॉफ्ट यांनी आयसीसी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. याउलट त्यांनी जोखमीची परिस्थिती शिताफीने हाताळली. कर्णधारांनी हस्तांदोलन करू नये असा निर्णय संयोजकांनी घेतला आहे हा मुद्दा पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांसमोर मांडला. आयत्यावेळी गोंधळ होऊ नये यासाठी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांशी समन्वय साधला.
पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे. पण आयसीसीने यासंदर्भात अंतर्गत चौकशी प्रक्रिया केली असून पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्या कामात कोणतीही चूक केलेली नाही तसंच नियमांचं उल्लंघन केलेलं नाही असं स्पष्टपणे नमूद केलं.
सामनाधिकारी तसंच पंचांची नियुक्ती आयसीसीतर्फे केली जाते. ही एक स्वतंत्र तटस्थ यंत्रणा आहे. पायक्रॉफ्ट यांना पदावरून दूर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. तसं होणं योग्य नाही असं आयसीसीने म्हटलं आहे.