आयपीएलच्या सातव्या मोसमातील अखेरच्या सामन्यापर्यंत ‘प्ले-ऑफ’च्या अखेरच्या स्थानासाठीची चुरस कायम आहे. वानखेडे स्टेडियमवर रविवारी गतविजेता मुंबई इंडियन्स माजी विजेत्या राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. परंतु राजस्थानच्या खात्यावर १४ गुण जमा असल्यामुळे ते चौथ्या स्थानाच्या स्पध्रेत सर्वात अग्रेसर आहेत. राजस्थानने मुंबईला हरवल्यास ते चौथ्या स्थानानिशी बाद फेरीत पोहोचतील. परंतु मुंबईच्या बालेकिल्ल्यावर त्यांना हरवणे हे कठीण आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. मागील दोन हंगामांमध्ये फक्त चेन्नई सुपर किंग्जलाच मुंबईला पराभूत करणे शक्य झाले आहे.
शुक्रवारी रात्री किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हरल्यामुळे राजस्थानला आता अखेरचा सामना आणि नशीब यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु रविवारचा सामना राजस्थानचा संघ हरला तर मग निव्वळ धावगतीच्या आधारे ‘प्ले-ऑफ’चा चौथा संघ ठरेल. सध्या तरी या तीन संघांपैकी राजस्थानचे (+०.२४७) पारडे जड आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सवरील लागोपाठच्या सामन्यांमधील विजयांमुळे मुंबई इंडियन्सच्या खात्यावर १२ गुण जमा आहेत. त्यांची निव्वळ धावगती -०.२४७ आहे. त्यामुळे त्यांना रविवारी नुसता विजय पुरेसा नाही, तर मोठय़ा फरकाने विजयाची त्यांना आवश्यकता आहे.
आयपीएलचा संयुक्त अरब अमिरातीमधील पहिला टप्पा मुंबई इंडियन्ससाठी अपयशी ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या वाटय़ाला ओळीने पाच पराभव आले. परंतु भारतातील दुसऱ्या टप्प्यात त्यांचे नशीब पालटले. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर मायकेल हसी आणि वेस्ट इंडिजचा लेंडल सिमॉन्स यांच्या सातत्यामुळे मुंबईच्या आशा जिवंत आहेत. अहमदाबादला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थानवर २५ धावांनी विजय मिळवला होता. पण मुंबईच्या संघाला आता प्रामुख्याने उणीव भासणार आहे ती वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची. याचप्रमाणे झहीर खानपाठोपाठ प्रवीण कुमारसुद्धा दुखापतग्रस्त झाल्यामुळे मुंबईच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात प्रवीणच्या खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.