India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेमध्ये सुरू आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले.

इंग्लंडचे माजी खेळाडू सिड लॉरेंस यांचं वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंनी माजी खेळाडूला श्रद्धांजली वाहिली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला त्यावेळी, दोन्ही संघातील खेळाडू हातावर काळ्या रंगाची पट्टी घालून मैदानात उतरले.

सिड लॉरेंस यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना इंग्लंडसाठी फार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. दुखापतीमुळे त्यांना बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. त्यांना १९८८ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांना इंग्लंडकडून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांनी ६० धावा केल्या. यासह गोलंदाजी करताना त्यांनी १८ गडी बाद केले. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना १ सामना खेळण्याची संधी मिळाली.

यादरम्यान त्यांनी ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. १९८८ मध्ये आपला पहिला सामना खेळल्यानंतर १९९२ मध्ये ते आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला नसला तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्यांनी १८५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १८५१ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्यांनी ५१५ गडी बाद केले. तर लिस्ट ए क्रिकेटमधील ११३ सामन्यांमध्ये त्यांनी २९१ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना त्यांनी १५५ गडी बाद केले.

इंग्लंडचा यशस्वी पाठलाग

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार सुरूवात केली आहे. इंग्लंडची धावसंख्या ४०० पार पोहोचली आहे. इंग्लंडकडून फलंदाजी करताना ओली पोपने १०६ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ६२ धावा केल्या आणि हॅरी ब्रूक ९९ धावांवर माघारी परतला.