भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यातच शुबमन गिलने शतक झळकावत दणक्यात सुरूवात केली आहे. शुबमन गिलने लीड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वी जैस्वालसह शतक झळकावत संंघाची धावसंख्या ३०० पार नेण्यात मोठी भूमिका बजावली. शुबमन गिल साई सुदर्शन बाद झाल्यानंतर मैदानावर फलंदाजीला आला आणि सावध पण प्रसंगी आक्रमक फटके लगावत संघाचा डाव उचलून धरला. पण यादरम्यान शुबमन गिलने आयसीसीच्या मोठ्या नियमाचं उल्लंघन केलं आहे.

कर्णधार शुबमन गिल मोठ्या अडचणीत सापडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) त्याच्यावर मोठी कारवाई करू शकते, कारण गिलने ICC चा एक मोठा नियम मोडला आहे. यासाठी त्याला मोठा दंडही होऊ शकतो. गिल पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना काळे पायमोजे घालून उतरला होता. पण हे आयसीसीच्या नियमाबाहेर आहे. पण नेमका हा काय नियम आहे? जाणून घेऊया.

काळ्या पायमोज्यांसंबंधित काय आहे आयसीसीचा नियम?

आयसीसीच्या नियम १९.४५ अनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू पांढऱ्या, क्रीम आणि राखाडी रंगाचे मोजे घालून मैदानावर उतरू शकतो. परंतु तो काळ्या रंगाचे मोजे घालू शकत नाही. तर शुबमन गिल काळ्या रंगाचे मोजे घालूनच खेळायला उतरला होता. जे आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यासारखं आहे. हा नियम मे २०२३ मध्ये लागू केला होता.

शुबमन गिलला नियमाच्या उल्लंघनाबाबत दंड ठोठावला जाणार?

गिलवर दंड आकारण्याचा निर्णय सामनाधिकारी घेतील. जर हेडिंग्ले कसोटी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि खेळाडूने जाणूनबुजून लेव्हल १ चा गुन्हा केल्याचं मानलं, तर शुबमन गिलला त्याच्या सामन्याच्या फीच्या सुमारे १० ते २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागू शकते.

पण, जर गिलने अनावधाने काळे मोजे घातले असतील किंवा त्याचे पांढरे मोजे ओले असल्याने त्याने असं केलं असेल, तर तो दंडातून वाचू शकतो. परंतु हा निर्णय मॅच रेफरीवर अवलंबून आहे. गिल व्यतिरिक्त, इतर अनेक खेळाडूंनी ड्रेस कोडचे उल्लंघन केले आहे.

आयसीसीच्या नियमाच्या उल्लंघनासाठी कोणाला मिळाली आहे शिक्षा?

२०१८ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान, केएल राहुलने आयसीसीच्या नियमांचे पालन न करणारे हेल्मेट घातले होते. यासाठी राहुलला त्याच्या मॅच फी च्या १० टक्के दंड भरावा लागला. तर २०१६ मध्ये बिग बॅश लीग दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलने सामन्यादरम्यान काळ्या बॅटचा वापर केला होता, जो आयसीसीच्या नियमांविरुद्ध होता. त्यामुळे गिलला १० टक्के दंड भरावा लागला.

२०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान, पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याला अनधिकृत लोगो वापरल्याबद्दल आयसीसीने दंड ठोठावला. त्याच्या मॅच फी च्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला. याशिवाय, २०२१ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान LGBTQ+ समुदायाला पाठिंबा देण्यासाठी इंद्रधनुष्य रंगाची जर्सी परिधान केल्याबद्दल इंग्लंडचा फलंदाज जो रूटला १५% दंड भरावा लागला.