Reasons Behind Virat Kohli Retirement: भारतीय संघातील ३ दिग्गज खेळाडूंनी लागोपाठ निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आर अश्विनने अचानक कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि आता विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपू्र्वीच विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने त्याला फेरविचार करण्याची विनंती केली होती. पण विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि भावूक पोस्ट शेअर करून १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला पूर्णविराम दिला. दरम्यान काय आहेत विराटच्या निवृत्ती घेण्यामागची कारणं? जाणून घ्या.

विराटचा फॉर्म

विराटने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीत घसरण झाली होती. गेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३८२ धावा करता आल्या. यादरम्यान त्याने अवघ्या २२.४७ च्या सरासरीने धावा करत १ शतक आणि १ अर्धशतक झळकावलं. २०१९ च्या आधी त्याने तिन्ही प्रारूपात धावांचा पाऊस पाडला होता. मात्र गेल्या चार वर्षांत त्याच्या फॉर्म आधीसारखा राहिला नव्हता. हे त्याच्या फलंदाजीतून स्पष्टपणे दिसत होतं. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतही त्याची बॅट शांत राहिली होती.

युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी

युवा खेळाडूंना संधी देणं हे देखील विराट कोहलीच्या निवृत्तीमागचं प्रमुख कारण असू शकतं. भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू आहेत, जे प्लेइंग ११ मध्ये संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. आता विराट कोहली निवृत्त झाल्यानंतर युवा फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करण्यासाठी

भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. या स्पर्धेत विराट आणि रोहितने बहुमूल्य योगदान दिले होते. इथून पुढे भारतीय संघाला २०२७ चा वर्ल्डकप खेळायचा आहे. विराटने टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता विराटचं संपूर्ण लक्ष २०२७ चा वर्ल्डकप जिंकण्यावर असणार आहे. त्यामुळे कदाचित विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असावी.

कुटुंबाला वेळ देण्यासाठी

कुटुंबामुळेही काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. क्रिकेटपटूंना व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवता येत नाही. विराटला दोन मुलं आहेत. क्रिकेटमुळे त्याला दोन्ही मुलांनाही वेळ देता येत नसेल. आता टी-२० आणि कसोटी क्रिकेटला रामराम केल्यनंतर विराट केवळ वनडे मालिका खेळताना दिसेल. त्यामुळे आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देता येईल.