Harshit Rana T20I Debut as Concussion Substitute player What is ICC Rule: भारत वि इंग्लंड चौथा टी-२० सामना १५ धावांनी जिंकत भारतीय संघाने टी-२० मालिका आपल्या नावे केली. रिंकू सिंगनंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबेच्या भागीदारीमुळे भारताने चांगली धावसंख्या उभारली. तर नंतर रवी बिश्नोई आणि पदार्पणवीर हर्षित राणा यांनी ३-३ विकेट्स घेत इंग्लंडचं कंबरडे मोडले. चौथ्या टी-२० सामन्यातील भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नसताना अचानक हर्षित राणाने टी-२० मध्ये पदार्पण करत गोलंदाजीसाठी मैदानात उतरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हर्षित राणा भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्या जागी पुण्यातील टी-२० सामन्यात कनक्शन सबस्टिट्यूट म्हणून मैदानावर उतरला. ८व्या षटकात मैदानावर आल्यावर राणाने लगेचच आपली उपस्थिती दाखवली ती म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा झेल घेतला. त्यानंतर त्याने पहिल्याच षटकात विकेट घेत सर्वांचं लक्ष वेधलं. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी पदार्पणानंतर शिवम दुबेला टी-२० मध्येही पदार्पणाची संधी मिळाली आहे.

राणाने आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकात लिव्हिंस्टोनला बाद केल्यानंतर १६व्या षटकात त्याने जेकब बेथेलला अवघ्या ६ धावांवर माघारी धाडले. त्याने जेमी ओव्हरटनला १९ धावांवर बाद करून ४ षटकांत ३३ धावा देत ३ विकेट्स घेतले. हर्षित राणाच्या या आगळ्यावेगळ्या टी-२० पदार्पणाबद्दल वाद निर्माण झाला. एका अष्टपैलू खेळाडूच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी देण्याबाबत तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले.

हर्षित राणाच्या कनक्शन सबस्टीट्यूटबाबत काय आहे ICC नियम?

आयसीसीच्या खेळण्याच्या नियम १.२.७.३ कनक्शन झाल्यास सबस्टिट्यूटच्या नियमाबद्दल सांगतो की, “सामन्यादरम्यान कनक्शन झालेल्या खेळाडूच्या जागी येणारा बदली खेळाडू जर त्याच्यासारखाच असेल आणि त्याच्या समावेशामुळे त्याच्या संघाला उर्वरित कालावधीसाठी जास्त फायदा होणार नाही, तर ICC मॅच रेफ्रीने सामान्यत: कनक्शन रिप्लेसमेंट रिक्वेस्टला मान्यता दिली पाहिजे.

नियम १.२.७.७ नुसार “कोणत्याही कनक्शन रिप्लेसमेंट विनंतीसंदर्भात ICC मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम असेल आणि कोणत्याही संघाला अपील करण्याचा अधिकार नसेल.”

२०२० मध्येही भारताला सारख्याच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात युझवेंद्र चहल रवींद्र जडेजाचा बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला आणि तीन विकेट्स घेत तो सामनावीर ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why was harshit rana allowed to bowl after coming in as concussion sub for shivam dube read icc rule ind vs eng bdg