Jasprit Bumrah: भारतीय संघ आशिया चषक २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहे. येत्या ९ सप्टेंबरपासून युएईत या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसून येणार आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे असणार आहे. मुख्य बाब म्हणजे, जसप्रीत बुमराह या संघाचा भाग आहे. पण तो या सर्धेतील सर्व सामने खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सने मोठी भविष्यवाणी केली आहे.
एबी डिविलियर्सच्या मते, जसप्रीत बुमराह आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामने खेळू शकणार नाही. त्याचा वर्कलोड लक्षात घेता त्याला काही सामन्यांमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे तो सर्व सामन्यात खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
बुमराहला विश्रांती देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक वेळा त्याला विश्रांती दिली गेली आहे. इंग्लंड दौऱ्यावर पाचही कसोटी सामन्यांसाठी बुमराहची भारतीय संघात निवड केली गेली होती. पण तो ५ पैकी केवळ ३ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. २ सामन्यांमध्ये त्याला विश्रांती दिली गेली होती.
काय म्हणाला एबी डिविलियर्स?
बुमराहबाबत बोलताना एबी डिविलियर्स म्हणाला, “बुमराहला संघात पाहून खूप आनंद होतोय. तो फिट आणि खेळण्यासाठी तयार आहे. पण मला वाटतंय, तो सर्व सामने खेळणार नाही. काही रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, त्याची निवड केवळ महत्वाच्या सामन्यांमध्ये केली जाईल. मला निवडकर्त्यांची ही गोष्ट आवडली. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला असा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “ बुमराह स्वतःहून विश्रांती घेत आहे, असं मुळीच नाही. क्रिकेट सामने खेळण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. आपल्या अनुभवी खेळाडूंना जर पाठिंबा मिळत असेल तर तो आणखी चांगली कामगिरी करतो. ते बुमराहबाबत असा निर्णय घेत आहेत, हे मला आवडलं.” यावरून हे स्पष्ट होत आहे की, जसप्रीत बुमराह आशिया चषकातील केवळ महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसू शकतो.