India Women’s ODI World Cup Qualification Scenario: सेमीफायनलसाठी तीन संघ पात्र ठरले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंडचा समावेश आहे. इंग्लंडने भारतीय संघाला पराभूत करत सेमीफायनल गाठली. तर आता अखेरच्या स्थानासाठी भारत, न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
श्रीलंका संघाने बांगलादेशचा अवघ्या ७ धावांनी पराभव केला आणि आपल्या सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या. यादरम्यान बांगलादेशचा संघ महिला वनडे विश्वचषकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. यानंतर आता भारतीय संघासह न्यूझीलंड, श्रीलंका यांच्यासाठी कसं समीकरण आहे जाणून घेऊया.
भारतीय संघ – ५ सामने, २ विजय, ४ गुण, नेट रन रेट ०.५२६
जर भारताने न्यूझीलंडविरूद्ध विजय मिळवला तर भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. पण, जर न्यूझीलंडविरूद्ध संघ पराभूत झाला तर इंग्लंडने न्यूझीलंड संघावर विजय मिळवेल अशी आशा संघ करेल.
न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यासही भारतासाठी ही चांगली गोष्ट ठरू शकते. टीम इंडिया जर बांगलादेशविरुद्ध हरली (आणि न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध हरले), तरी भारत सेमीफायनलसाठी क्वालिफाय करेल, पण श्रीलंका आणि पाकिस्तानपैकी एकही संघ सहा गुणांपर्यंच पोहोचणार नाहीत, अशी प्रार्थना करावी लागेल.
जर भारताचे पुढील दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले, तर संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल, पण जर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत केले तरच. जर वरील परिस्थितीत श्रीलंका आणि पाकिस्तानपैकी एकाचे भारताशी सहा गुण बरोबरीत असतील, तर भारत चांगल्या नेट रन-रेटसह सेमीफायनल गाठेल.
न्यूझीलंड – ५ सामने १ विजय, ४ गुण, नेट रन रेट -०.२४५
न्यूझीलंडचा भारताविरूद्धचा पुढील सामना करो या मरो असणार आहे. भारताविरूद्ध सामना गमावल्यास न्यूझीलंड संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. पण जर त्यांनी त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकले तर न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
जर न्यूझीलंडने भारताला हरवलं पण इंग्लंडकडून पराभूत झाले तर त्यांना बांगलादेशने भारताचा पराभव करण्याची आशा करावी लागेल. वरील परिस्थितीत श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास ती संघासाठी चांगली गोष्ट असेल.
श्रीलंकेने बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला हरवलं तर त्यांना सहा गुण मिळू शकतात, तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला पराभूत केल्यास त्यांना सहा गुण मिळू शकतात. परंतु न्यूझीलंडचा नेट रन-रेट चांगला आहे. जर बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत केलं तर भारताचा बांगलादेशशी सामना पावसामुळे रद्द होण्याची न्यूझीलंड अपेक्षा करेल.
श्रीलंका – ६ सामने, १ विजय, २ गुण, नेट रन रेट – -०.५७८
सेमीफायनल गाठण्यासाठी, श्रीलंकेला पाकिस्तानला पराभूत करावं लागेल आणि भारताने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावावेत अशी आशा करावी लागेल. तर इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करावं, अशी आशा करावी लागेल.
वरील परिस्थितीत श्रीलंकेचे न्यूझीलंडसह सहा गुण असतील, परंतु जर त्यांनी पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला नाही तर नेट रन-रेटमध्ये ते मागे राहतील.
पाकिस्तान – ५ सामने, एकही विजय नाही, २ गुण, २ सामने रद्द, नेट रन रेट – -१.८८७
आतापर्यंत एकही विजय मिळवलेला नसला तरी, पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. त्यांना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धचे त्यांचे शेवटचे दोन्ही सामने अशा फरकाने जिंकावे लागतील की त्यांचा नेट रन-रेट न्यूझीलंडपेक्षा जास्त असेल आणि भारत त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावेल अशी आशा आहे.