अहमदाबाद : अंतिम सामन्याला ९० हजारांहून अधिक प्रेक्षकांचा पाठिंबा हा अभूतपूर्व होता. भारतीय संघाला मिळणारा पाठिंबा निश्चितच भारतीय खेळाडूंना प्रेरित करणारा होता; पण विराट कोहली बाद झाल्यावर मैदानावर पसरलेली शांतता मनाला सर्वाधिक समाधान देणारी होती, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कमिन्स ऑस्ट्रेलियाचा पाचवा विश्वविजेता कर्णधार ठरला. या विजेतेपदाने मी पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटच्या प्रेमात पडलो आहे, असे कमिन्स म्हणाला. ‘‘माझा एक अधिक उसळलेला चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात कोहली त्रिफळाचीत झाला. त्या वेळी जेव्हा संपूर्ण मैदानावर शांतता पसरली ती आताही मला जशीच्या तशी डोळय़ासमोर दिसत आहे. तो क्षण सर्वात सुंदर होता यात शंकाच नाही,’’ असेही कमिन्सने सांगितले.

हेही वाचा >>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

या आठवणी प्रदीर्घ मनात घर करून राहतील, असे सांगून कमिन्स म्हणाला, ‘‘विश्वचषक स्पर्धेचा वारसा इतका समृद्ध आहे, की तो विसरता येणार नाही. गेल्या दोन महिन्यांत या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक उत्कंठावर्धक सामने झाले, अनेक गोष्टी घडल्या ज्या कायम मनात घर करून राहतील. ऑस्ट्रेलियासाठी हे वर्ष खूपच यशस्वी गेले. आम्ही अ‍ॅशेस जिंकली, कसोटी क्रिकेटसह आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही जागतिक विजेतेपद मिळवले. या तीनही वेगवेगळय़ा कामगिरीचा मला अभिमान वाटतो.’’ ‘‘या विजेतेपदात संघातील प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या कुटुंबीयाला काही ना काही गोष्टींचा त्याग करावा लागला आहे. संघातील प्रत्येक व्यक्तीचा अभिमान वाटावा अशी त्यांची कथा आहे,’’असेही कमिन्स म्हणाला. पत्रकार परिषदेत कमिन्सने उत्साही प्रेक्षकांनाही सलाम केला. त्यांच्या उत्साहाची आणि प्रेमाची दाद द्यायलाच हवी, असे सांगून कमिन्सने सांगितले, ‘‘सकाळी उठलो तेव्हा खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावले, तर सगळा रस्ता निळा झालेला दिसत होता. भारतीय संघाचा पोशाख परिधान करून अनेक चाहते सकाळपासून हॉटेलबाहेर उपस्थित होते. लांबवर नजर टाकली तर, रस्त्यावरून निळय़ा रंगाच्या जणू लहरी निघताना दिसत होत्या. या सगळय़ा वातावरणाने एक वेळ भारावून गेलो; पण दुसऱ्याच क्षणी थोडा घाबरून गेलो. याच चिंतेने मला वेगळी ऊर्जा दिली हे तितकेच खरे आहे.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World cup 2023 virat kohli dismissal most satisfying says pat cummins zws