बेलग्रेड : भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदकाची कमाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बजरंगने कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिव्हेरावर ११-९ अशी सरशी साधली. बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे. बजरंगने यापूर्वी २०१३मध्ये बुडापेस्ट आणि २०१९मध्ये नूर-सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर २०१८मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंगला यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन दिआकोमिहालीसकडून बजरंगचा पराभव झाला. परंतु जॉनने अंतिम फेरी गाठल्याने बजरंगला रेपिचेजमधून संधी निर्माण झाली.

रेपिचेजमध्ये बजरंगने अर्मेनियाच्या वेझगेन तेव्हनयानवर ७-६ असा निसटता विजय मिळवत कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला. मग रिव्हेराला ०-६ अशा पिछाडीनंतरही ११-९ अशा फरकाने नमवत त्याने कांस्यपदकावर मोहोर उमटवली. यंदाच्या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे पदक ठरले. महिलांच्या ५३ किलो वजनी गटात विनेश फोगटनेही कांस्यपदक पटकावले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestler bajrang punia won bronze medal in world wrestling championship zws