क्रीडापटूंसाठी मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा अर्जुन पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीपटू राहुल आवारे याची शिफारस करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती महासंघ यांच्याकडून त्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय, कुस्ती महासंघाकडून हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांचीही शिफारस करण्यात आली आहे.

राहुल आवारे

 

भारतीय क्रीडापटूंसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठीही शिफारस करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या दोघांची शिफारस करण्यात आली आहे. २०१८ साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाकारला गेल्याने संतप्त झालेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. पण यावेळी त्याची शिफारस करण्यात आली आहे.

याशिवाय, द्रोणाचार्य पुरस्कारासाठी वीरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची शिफारस करण्यात आली आहे. तर भीम सिंग आणि जय प्रकाश यांना ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी BCCI ने अर्जुन पुरस्कारांसाठी पुनम यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. क्रिकेट क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल BCCI ने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला या नावांची शिफारस केल्याचं कळतंय. क्रिकेट प्रशासकीय समितीने या नावांची घोषणा केली.

आतापर्यंत ५३ क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. १९६१ साली सलीम दुराणी यांना पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार देण्यात आला. २०१८ साली महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. ज्येष्ठतेच्या निकषावर अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यात येते.