बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने सामन्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे रविवारी (२५ डिसेंबर) ३ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. ज्यामुळे भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली. विजयासाठी मिळालेले १४५ धावांचे लक्ष्य भारताने ४७ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय क्रिकेट संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक मालिका जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. मात्र, भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, असे नाही. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला त्यांच्या भूमीवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३च्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत आता फक्त चार संघ आहेत, ज्यात ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अंतिम शर्यतीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पाचवा संघ ठरला आहे. पाकिस्तानपूर्वी इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि बांगलादेश हे संघ याआधीच बाहेर पडले आहेत. याशिवाय, या विजयासह भारतीय संघाने विजयाची टक्केवारी वाढवली आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नवीन सायकलमध्ये टीम इंडियाची विजयाची टक्केवारी सध्या ५८.९३% आहे. गुणतालिकेत संघ दुसऱ्या स्थानावर आहे. भारतापेक्षा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत ७६.९२% ने सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ५४.५५% आहे, तर श्रीलंका संघ ५३.३३% ने सामना जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा संघ क्लीन स्वीप स्विकारत असताना, अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, भारतीय संघ बांगलादेशकडून दुसरा सामना हरला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने भारताला मायभूमीत होणाऱ्या मालिकेत पराभूत केले, तर पाकिस्तान संघ सर्वोत्तम दोन मध्ये येऊ शकतो. परंतु आता ते घडणे शक्य नाही. मात्र, पाकिस्तानचा संघ पहिल्या ४ मध्ये पोहोचू शकतो.

हेही वाचा: विश्लेषण : अवघ्या सहा सामन्यांत WTC च्या अंतिम फेरीत जाण्याची भारताला संधी? जाणून घ्या नेमकी कशी असेल आकडेमोड!

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशात होणारी मालिका महत्वाची

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी सध्या फक्त तीन संघ लढत आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे अंतिम फेरीत जाणे जवळपास निश्चित आहे. फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि भारताला स्वत:ला चांगली कामगिरी करावी लागेल आणि दुसऱ्या संघाकडून खराब कामगिरीची आशा करावी लागेल. भारताला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. या मालिकेत भारताने चांगली कामगिरी केल्यास त्यांना कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महत्त्वाचे गुण मिळतील आणि अंतिम फेरीत जाण्याचा त्यांचा मार्ग सुकर होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc points table victory over bangladesh but pakistan eliminated india double advantage in world test championship equation avw