Michael Vaughan Reaction On Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा होता. १२४ धावांचा पाठलाग करत असताना भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तर पराभूत झालेल्या भारतीय संघावर जोरदार टीका केली जात आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करून भारतीय संघावर बोचरी टीका केली आहे. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी देखील तुफान चर्चेत आहे. कारण या खेळपट्टीवर फलंदाज संघर्ष करताना दिसून आले. तर सामन्याचा निकाल अवघ्या अडीच दिवसात लागला.

मायकल वॉनने आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “अशी खेळपट्टी तयार कराल तर हेच होणार, तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन्सकडून पराभूत होण्यास पात्र आहात.” भारतीय संघावर टीका करताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं कौतुक देखील केलं आहे. दक्षिण आफ्रिकेने काही महिन्यांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता.

आता भारतीय संघाविरूद्धच्या पहिल्या कसोटीतही दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्सारखा खेळ करून दमदर विजयाच नोंद केली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

चेतेश्वर पुजाराची संतप्त प्रतिक्रिया

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा सध्या समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. हा सामना झाल्यानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना त्याने भारतीय संघावर जोरदार टीका केली. तो म्हणाला, “सामना चांगल्या खेळपट्टीवर खेळवा. जर भारतीय अ संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा मुख्य संघ जरी आमनेसामने आले तरीदेखील भारतीय अ संघ जिंकेल. भारतात इतके टॅलेंटेड खेळाडू आहेत. पण तुम्ही म्हणता, भारतीय संघ संक्रमणाच्या टप्प्यातून जात असल्यामुळे पराभव झाला. हे पचणारं नाही.” असं चेतेश्वर पुजारा म्हणाला.