राजेंद्र श्रीकृष्ण भट
अक्षय्यतृतीयेच्या आसपासचा काळ हा फळभाज्यांच्या लागवडीसाठी उत्तम असतो. या काळात बियांची पेरणी करून रोपे तयार केली जातात आणि पावसाळ्यात त्यांची पुन्हा लागवड केली जाते. पावसाच्या आधी लागवड करून रोपे तयार केल्यास ती मजबूत होतात आणि पावसाच्या माऱ्यातही तगून राहतात. राज्याच्या भागांत या काळात पाणी असते आणि ते पावसाळ्यापर्यंत पुरते, तिथे या कंद पिकांची लागवड केली जाते. आपण आपल्या गॅलरीत आणि कुंडय़ांमध्ये हळद आणि आले लावू शकतो. आंबेहळद, हळद आणि आल्याला थोडी सावली असली तरी चालते.
कोकण पश्चिम घाट आणि विदर्भाच्या काही भागांत अनेक प्रकारचे भाज्यांचे कंद उपलब्ध असतात. त्यांची लागवड या काळात करणे उत्तम. काही वेली असतात तर काही झुडपे असतात. त्यांना राख घातल्यास चांगली वाढ होते. शहरात पावाच्या बेकरीमध्ये राख मिळू शकते.
याच काळात सुरणाच्या कंदाला कोंब येतात. आपल्या नेहमीच्या भाजीविक्रेत्याला सांगून ठेवल्यास त्याच्याकडून हे कोंब मिळू शकतात. छोटे सुरण घेऊन त्याचे कोंब वापरावेत. सुरणाचे अनेक तुकडे करता येतात आणि बाह्य़ भागावरच्या टेंगुळातून कोंब येतात. मधल्या भागातून येणाऱ्या कोंबाचा काही भाग या तुकडय़ांमध्ये असला, तरी त्यातून नवे कोंब येऊन झाड तयार होते.
माती जेवढी पोकळ असेल, तेवढे कंद चांगले वाढतात. कंद लावताना त्याभोवती सुका पालापाचोळा टाकावा. वेल लावताना आधार देण्याची सोय आधीच करावी. आपल्या भागानुसार पालेभाज्यांचे बी पेरावे. या काळात लागवड करून अक्षय्य पर्यावरण निर्माण करावे.
