भारत ही स्मार्टफोनची प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. आजघडीला ३० ते ४० कोटी लोकसंख्येकडे स्मार्टफोन असला तरी स्मार्टफोन वापरकर्त्यांचा आकडा एकूण लोकसंख्येच्या निम्माही नाही. किमतीला स्वस्त आणि भरपूर वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन ही भारतातील एका मोठय़ा वर्गाची गरज आहे. ‘टेक्नो’चा ‘कॅमन आय’ हा स्मार्टफोन या गरजेला पुरून उरतो इतकेच!
भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या ३० ते ४० कोटींच्या घरात असून हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा ५३ कोटींवर पोहोचेल, असा एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. एका वर्षांत १५-२० कोटी स्मार्टफोन वापरकर्त्यांची वाढ कोणत्याही स्मार्टफोन निर्मात्या कंपनीला हवीहवीशी वाटणारी आहे. अशा वेळी भारतात नवनवीन स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या शिरकाव न करतील तर नवलच! कमी किमतीतील आणि तरीही जास्त वैशिष्टय़े असलेले स्मार्टफोन ही भारतीय बाजाराची गरज आहे, हे आता उघड सत्य आहे. त्यामुळे अगदी नामांकित ब्रॅण्डपासून नवीन कंपन्यांपर्यंत सारेच जण दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन बनवण्यावर भर देत आहेत. या यादीत ‘ट्रॅन्सिन होल्डिंग्ज’ या कंपनीकडून निर्माण केला जाणारा ‘टेक्नो’ या ब्रॅण्डचाही समावेश झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारात प्रवेश केलेल्या ‘टेक्नो’ने ‘कॅमन आय’ हा स्मार्टफोन सादर केला आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील नामांकित कंपन्यांच्या स्मार्टफोनना टक्कर देणारा फोन असे याचे वर्णन करता येईल.
डिझाईन
‘टेक्नो कॅमन आय’ हा हातात घेतल्यावर क्षणभर हा नक्की खराखुरा फोन आहे का, असे वाटण्याइतपत हा फोन हलका आहे. नेहमीच्या स्मार्टफोनपेक्षा उंच पण दोन्ही बाजूंनी काहीसा कमी असा हा स्मार्टफोन हातात अतिशय व्यवस्थित मावतो. चारही बाजूंना वक्राकार कडा असल्याने फोन हाताळणेही सोपे आहे. पुढील बाजूस १४.३५ सेंमीचा १४४० बाय ७२० पिक्सेलचा डिस्प्ले असून त्यावर सेल्फी कॅमेरा, स्पीकर ग्रिल आणि एलईडी फ्लॅश पुरवण्यात आले आहेत. खालच्या बाजूस कोणतीही बटणे नसून टचस्क्रीनद्वारेच हा फोन हाताळता येतो. व्हॉल्यूमची बटणे फोनच्या डावीकडे असून फोनची उंची वाढल्याने ही बटणेही काहीशी लांब गेली आहेत. त्यामुळे पहिल्यांदा फोन हाताळताना ‘व्हॉल्यूम’ नियंत्रण करताना अडचणी येतात; पण हा झाला सवयीचा भाग. फोनच्या मागील बाजूस कॅमेरा आणि फिंगरप्रिंट स्कॅनर पुरवण्यात आला आहे.
कॅमेरा
या फोनला मागील तसेच पुढील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला आहे. दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत दोन्ही बाजूला १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा फारच कमी फोनमध्ये दिसून येतो. दोन्ही कॅमेऱ्यांना एलईडी फ्लॅशची जोड देण्यात आली आहे. ही सर्व आयुधे योग्य रीतीने मांडण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ‘टेक्नो कॅमन आय’मधील छायाचित्रणाचा अनुभव फारसा चांगला नाही. दोन्ही कॅमेरे ‘बरे’ म्हणता येतील, इतक्याच दर्जाचे आहेत. मागील कॅमेऱ्यातून साधारण २० फूट अंतरावरील वस्तूचे काढलेले चित्र सुस्पष्ट येत नाही, तर ‘झूम’ केल्यावर येणाऱ्या छायाचित्रावर ‘ग्रेन्स’ दिसून येतात. अपुऱ्या प्रकाशात तर हे कॅमेरे खूपच वाईट छायाचित्रे देतात. फ्रंट कॅमेऱ्यातून नीट फोकस करून काढलेला सेल्फीही फारसा सुस्पष्ट नाही. एकूणच कॅमेऱ्यांची वैशिष्टय़े कागदावर आकर्षक असली तरी वापरात मात्र त्यांचा अनुभव सुखावह नाही.
सॉफ्टवेअर
‘टेक्नो कॅमन आय’मध्ये अँड्रॉइडची अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टम ‘नोगट’ बसवण्यात आली आहे. याखेरीज ‘टेक्नो’च्या ‘हायओएस’ या कार्यप्रणालीची त्याला जोड लाभली आहे. या कार्यप्रणालींच्या सुसंगतीमुळे फोन अधिक सक्षमपणे काम करतो. तसेच ‘हायओएस’मुळे केवळ वेगवेगळ्या प्रकारे ‘स्वाइप’ करून आज्ञा देता येतात.
वैशिष्टय़े
डिस्प्ले : १८:९ अॅस्पेक्ट रेशिओ. १४.३५ सेंमी आकाराची स्क्रीन
डय़ूअल सिम (नॅनो)
अँड्रॉइड नोगट ऑपरेटिंग सिस्टम
१३ मेगापिक्सेल फ्रंट व बॅक कॅमेरा
तीन जीबी रॅम व ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेज
६४ बिट १.३ गिगाहार्ट्झ क्वाड कोअर प्रोसेसर
बॅटरी ३०५० एमएएच
१०० दिवसांची ‘रिप्लेसमेंट वॉरंटी’
एक वेळ ‘स्क्रीन रिप्लेसमेंट’ मोफत
रंग : मिडनाइट ब्लॅक, शँपेन गोल्ड, सिटी ब्लू.
किंमत : ८,९९९ रुपये
बॅटरी
या फोनमध्ये ३०५० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असून ती साधारण नऊ तास व्यवस्थित चालते. बॅटरीमुळे फोन गरम झाल्याचेही पहिल्या पाहणीत दिसून आले नाही.
कामगिरी
या फोनमध्ये तीन जीबी रॅम असून ३२ जीबीअंतर्गत स्टोअरेज पुरवण्यात आली आहे. हा फोन ज्या किंमत श्रेणीत उपलब्ध आहे, त्या श्रेणीतील अन्य स्मार्टफोन इतक्याच क्षमतेचे हार्डवेअर या फोनमध्येही आहे. या फोनमध्ये ‘मीडियाटेक एमटी६७३७’ हा प्रोसेसर असून तो व्यवस्थितपणे काम करतो. मात्र, जास्त आकार असलेले अॅप सुरू होताना काहीसा वेळ लागतो. फोनची किंमत आणि त्यातील हार्डवेअर पाहता, ही या फोनमधील त्रुटी आहे, असे म्हणता येणार नाही.
निरीक्षण
‘टेक्नो कॅमन आय’ हा परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोन आहे. सुमारे ८ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य फोनपेक्षा हा फोन वेगळा नसला तरी तो त्यांच्यापेक्षा कमी खचितच नाही. या फोनच्या कॅमेऱ्याबाबत निश्चितच सुधारणेला वाव आहे.
नवलाई : ‘झायकॉम’चे ‘स्ट्रीट स्मार्ट’
‘झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम’ या इलेक्ट्रॉनिक सुरक्षितता सेवा उद्योगातील कंपनीने प्रथमच वाहनक्षेत्रात पाऊल टाकत अनोखी व पहिली वाहन प्रवासी सुरक्षितता सुविधा ‘स्ट्रीट स्मार्ट’ सुरू केली आहे. भारत ही जगातील सहाव्या क्रमांकाची कार बाजारपेठ असून, देशात २.०३ दशलक्ष प्रवासी गाडय़ा विकल्या जातात आणि भारतात अपघातांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन कंपनीने ‘आयओटी’च्या शक्तीचा वापर करून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करणारी ‘स्ट्रीट स्मार्ट’ ही जीपीएस आधारित सुविधा विकसित केली. ‘स्ट्रीट स्मार्ट’ सुविधेच्या कल्पकतेमुळे गाडीच्या मालकाचे आपल्या गाडीवर चोरी, वेग किंवा ब्रेकडाऊन याबाबतीत पूर्ण नियंत्रण राहील. या सुविधेंतर्गत अपघाताची तातडीने सूचना देणे, वाहन बंद पडल्यास संपर्क कक्षाशी जोडणी, नियम उल्लंघन होत असल्यास चालकाला इशारा, जीपीएस ट्रॅकिंग, टोइंग इशारा, इंधन कार्यक्षमता अशी मोलाची माहिती पुरवली जाते.
‘इन्फिनिक्स’चा ‘हॉट एस३’
‘इन्फिनिक्स’ या नवीन कंपनीने भारतात ‘हॉट एस३’ हा नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे. दोन श्रेणींमध्ये हा फोन भारतीय बाजारात उपलब्ध आहे. यापैकी एका फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज क्षमता असून त्याची किंमत ८९९९ रुपये इतकी आहे. दुसऱ्या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज क्षमता असून त्याची किंमत १०,९९९ रुपये इतकी आहे. या मोबाइलमध्ये २० मेगापिक्सेलचा कॅमेरा, अॅण्ड्रॉइड ओरियो ऑपरेटिंग सिस्टीम, ४००० एमएएच बॅटरी, स्नॅपगॉर्डन ४३०ओक्टा-कोअर प्रोसेसर अशी वैशिष्टय़े आहेत.
