आयुर्वेदात स्वयंपाकघर हा आरोग्याचा खजिना मानला गेला आहे. कारण- स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत की, जे तुमच्या त्वचेपासून केसांपर्यंत विशेष काळजी घेऊ शकतात. तृयातील एक म्हणजे तांदळाचे पाणी. तांदूळ धुतल्यानंतर त्यातील पाणी अनेक जण फेकून देतात; तर बहुतेक जण शिजवल्यानंतरही राहिलेले पाणी फेकून देतात. पण, तुम्हीदेखील असे करीत असाल तर थांबा! कारण- या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, अमिनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक पोषक घटक आहेत; जे त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अनेक आशियाई देशांमध्ये फार पूर्वीपासून विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून तांदळाचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे केस आणि त्वचेसाठी तांदळाचे पाणी किती गुणकारी आहे ते जाणून घेऊ या.

तांदळाचे पाणी त्वचा आणि केसांसाठी कसे फायदेशीर ठरते?

‘मेडिकल न्यूज टुडे’च्या मते, तांदळाचे पाणी म्हणजे तांदूळ शिजवल्यानंतर किंवा धुतल्यानंतर उरलेले पिष्टमय पाणी. ज्यात अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स असे अनेक पोषक घटक त्यात आढळतात. हे पोषक घटक पचनास मदत करतात, तसेच शरीरातील ऊर्जा वाढवून शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतात. तांदळाच्या पाण्यात कर्बोदके असतात; जी ऊर्जा आणि मूड सुधारण्यास मदत करतात. त्याशिवाय त्यात प्रीबायोटिक्सदेखील असतात; जी आतड्यांचे आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तांदळाचे पाणी अतिसार, बद्धकोष्ठता, अपचन व गॅस्ट्रोएन्टेरिटिस यांसारख्या पाचक समस्या टाळण्यास किंवा त्यावर उपचार करण्यास मदत करू शकते.

तांदळाचे पाणी निर्जलीकरणामुळे गमावलेले द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरू शकते. याव्यतिरिक्त, तांदळाचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते, विशेषत: गरम हवामान किंवा तापादरम्यान ते आरोग्य संतुलित राखण्यास मदत करते, तांदळाचे पाणी शरीराला थंड ठेवते आणि उष्माघात किंवा निर्जलीकरण टाळते. ते शरीरातील विषारी पदार्थ आणि अशुद्धता बाहेर काढून शरीराला डिटॉक्सिफाइड करण्यासही मदत करते.

त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी तांदळाचे पाणी खूप प्रभावी मानले जाते. या पाण्यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट व अँटी-एजिंग गुणधर्म आहेत; जे त्वचेचे संरक्षण करून त्वचा मुलायम करण्यास मदत करते. त्याशिवाय तांदळाचे पाणी त्वचेवरील सुरकुत्या आणि रेषा कमी करून शरीर हायड्रेट ठेवण्यासही मदत करू शकते. कारण- त्यात स्टार्च असते; जे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. एटोपिक एक्झिमा असलेल्या लोकांसाठी हे प्रभावी मानले जाते.

केसांसाठीही फायदेशीर

तांदळाचे पाणी केवळ त्वचेलाच नव्हे, तर केसांना पोषण देत मजबूत बनवते. तांदळाच्या पाण्यात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात; ज्यामुळे केसांची गुणवत्ता आणि वाढ यामध्ये सुधारणा करते. केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा कंडिशनर म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्याशिवाय केसातील कोंडा कमी करण्यासाठीही तांदळाचे पाणी फायदेशीर मानले जाते.

तांदळाचे पाणी तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी निःसंशयपणे चांगले आहे; परंतु काही खबरदारीही आवश्यक आहे. कारण- कधी कधी तांदळात काही रासायनिक घटत असतात, ज्याने आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. यामुळे काही लोकांना यामुळे ॲलर्जीही होऊ शकते. अशा परिस्थितीत तांदळाचे पाणी वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.