Kidney Damage: बदललेली जीवनशैली, मानसिक तणाव, अनियमित आहार, अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस विविध आजार वाढू लागले आहेत. अगदी लहान वयातील मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी आरोग्य समस्यांचा सामना करीत आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आजारांची समस्या असणारी एक तरी व्यक्ती प्रत्येक घरात पाहायला मिळते. या आजाराचे शरीरावर न दिसून येणारे अनेक गंभीर परिणाम होतात. त्यात मूत्रपिंडाची समस्या अनेक महिला आणि पुरुषांमध्ये पाहायला मिळत आहे. परंतु, उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यावर खरंच गंभीर परिणाम होऊ शकतो का? याबाबत आम्ही तज्ज्ञांचे मत जाणून घेतले.

उच्च रक्तदाब असल्यास काय होते?

“मूत्रपिंडे ही मुळात सातत्याने शुद्धीकरणाचे कार्य करीत असतात. त्यासाठी ती सुस्थितीतील, लवचिक रक्तवाहिन्यांवर अवलंबून असतात. उच्च रक्तदाब या रक्तवाहिन्यांना थेट नुकसान पोहोचवतो, ज्यामुळे मूत्रपिंडांची कार्यक्षमता कमी होते. यात धोका असा आहे की, अशा रीतीने रक्तवाहिन्यांचे वर्षानुवर्षे हळूहळू नुकसान होत असते आणि त्यानंतर काही लक्षणेच दिसून येतात,” अशी माहिती मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट व सल्लागार डॉ. परिन सांगोई यांनी दिली.

“वारंवार होणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे मूत्रपिंडातील संवेदनशील रक्तवाहिन्यांवर सातत्याने दबाव येतो. त्यामुळे कालान्वये हळूहळू रक्तवाहिन्या कडक होत जाऊन आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे मूत्रपिंडाचे शुद्धीकरणाचे आणि द्रवपदार्थ संतुलित करण्याचे कार्य कमी होते. या संथपणे येत असलेल्या ताणामुळे मूत्रपिंडे बिघडत असल्याची लक्षणे तत्काळ दिसू शकत नाहीत; परंतु कालांतराने हा ताण दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराला कारणीभूत ठरू शकतो,” असे डॉ. सांगोई यांनी स्पष्ट केले.

काय लक्षात घ्यायला हवे?

“उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’, असे नाव देण्यात आले आहे. कारण- त्यामुळे हळुवारपणे मूत्रपिंडाचे नुकसान होत असते. जर ते लक्षात आले नाही, तर मूत्रपिंडाचे कार्य इतके कमी होऊ शकते की, डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण आवश्यक होऊन बसते,” असे डॉ. सांगोई यांनी सांगितले.

चांगली गोष्ट म्हणजे रक्तदाब लवकर नियंत्रित केल्याने गुंतागुंत होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. नियमितपणे देखरेख करणे, औषधांचे पालन करणे, कमी मीठ (सोडियम)युक्त आहाराचे पालन करणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे, धूम्रपान करणे टाळणे व मधुमेह नियंत्रित करणे यांमुळे लक्षणीयरीत्या मदत मिळू शकते.

मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्यास काय होते?

ठाणे येथील किम्स हॉस्पिटल्सच्या मधुमेह विभागाचे प्रमुख डॉ. विजय नेगलूर यांनी सांगितले की, जेव्हा तुमच्या रक्तात जास्त काळ साखर असते तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांना रक्ताच्या शुद्धीकरणासाठी जास्त मेहनत करावी लागते. “कालांतराने लहान रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त दाब पडल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते आणि मूत्रपिंडांची रक्त शुद्ध करण्याची क्षमता कमी होऊ शकते. म्हणूनच साखरेची उच्च पातळी असलेल्या लोकांच्या मूत्रपिंडांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते,” असे डॉ. नेगलूर म्हणाले.

मूत्रपिंड नैसर्गिकरीत्या रक्ताच्या शुद्धीकरणाचे काम करतात. जास्त साखरेमुळे मूत्रातून प्रथिने बाहेर पडू लागतात, ज्यामुळे त्यांच्यावर ताण येतो, असे सूचित होते. “कालांतराने, त्यामुळे मधुमेही व्यक्तीला मूत्रपिंडाचाही आजार होऊ शकतो, ज्यामध्ये मूत्रपिंडाचे कार्य कमी होत जाते,” असे डॉ. नेगलूर यांनी स्पष्ट केले.

काय लक्षात ठेवायला हवे?

योग्य आहार, नियमित व्यायाम व नियमित वैद्यकीय तपासणी याद्वारे साखरेची पातळी संतुलित राखणे हे सर्वांत महत्त्वाचे पाऊल आहे. चांगले हायड्रेटेड राहणे, पॅकबंद मिठाईंचे जास्त सेवन टाळणे आणि दररोज साखरेच्या सेवनाचे निरीक्षण करणे या बाबी मूत्रपिंडाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी बऱ्याच प्रमाणात साह्यभूत ठरतात.

उच्च रक्तदाब किंवा उच्च साखरेचा मूत्रपिंडांवर जास्त परिणाम होतो का?

डॉ. नेगलूर यांनी असे स्पष्ट केले की, जरी दोन्ही बाबी हानिकारक असल्या तरी रक्तात साखरेचे सातत्याने वाढते प्रमाण राहणे मूत्रपिंडांवर थेट आणि हळूहळू परिणाम करण्याची शक्यता जास्त असते. “दीर्घकाळापासून अनियंत्रित मधुमेह मूत्रपिंडाच्या लहान फिल्टरिंग युनिट्सचे (ग्लोमेरुली)ला कायमचे नुकसान करतो. उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांना दुखापत करून आणि शुद्धीकरणाची कार्यक्षमता कमी करून मूत्रपिंडांनाही नुकसान पोहोचवतो. परंतु, जर रक्तातील साखर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाबाहेर असेल, तर ते बहुतांशी जलद गतीने आणि अधिक प्रमाणात मूत्रपिंडाचे नुकसान करते,” असे डॉ. नेगलूर म्हणाले.

डॉ. नेगलूर यांनी, “बहुतेक रुग्णांमध्ये रक्तदाब आणि साखरेचे प्रमाण वाढलेले असते. या दोन्ही संयुक्तपणे होणाऱ्या त्रासामुळे मूत्रपिंडाचे नुकसान लवकर होते. म्हणूनच मूत्रपिंडाच्या संरक्षणासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, तसेच रक्तदाब सुरक्षित मर्यादेत ठेवणे आत्यंतिक आवश्यक आहे,” असेही सांगितले.