How To Engage Core Perfectly : एखादा अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यात काय चालू आहे, फिट राहण्यासाठी ही मंडळी काय करतात, काय डाएट फॉलो करतात याची उत्सुकता आपल्या सगळ्यांमध्येच असते. तर आज अशाच एका अभिनेत्रीने एक फिटनेस ट्रिक आपल्याबरोबर शेअर केली आहे. तर या अभिनेत्रीचे नाव आहे विद्या माळवदे. तुम्ही तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात आणि नुकत्याच आलेल्या मिसमॅच या मालिकेमध्येसुद्धा पाहिले असेल. तर अभिनेत्री अनेकदा शरीराला उपयुक्त अशा टिप्स सगळ्यांबरोबर शेअर करत असते.

आपल्या सगळ्यांना दिवस-रात्र काम करून, ऑफिसमध्ये सतत बसून पाठदुखी आणि पोट सुटण्याची समस्या जाणवते. त्यासाठी आपण जेवढे उपाय करावे तेवढे कमीच आहेत. तर आज अभिनेत्री विद्या माळवदे हिने कोअर स्ट्रेंथ कशी वाढवायची यासाठी खास उपाय सांगितला आहे. कोअर म्हणजे केवळ ॲब्स नव्हे, तर संपूर्ण शरीराची स्थिरता, पाठ व नितंब यांचा समावेश असलेले एक महत्त्वाचे व्यायाम क्षेत्र आहे, जे योग्य पद्धतीने बळकट करणे आवश्यक आहे.

तर अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे पेल्विक म्हणजे ओटीपोटाचा भाग ‘अ‍ॅन्टेरियर पेल्विक टिल्ट’ आणि ‘पोस्टेरियर पेल्विक टिल्ट’ अशा दोन दिशांमध्ये वाकतो. अ‍ॅन्टेरियर पेल्विक टिल्ट म्हणजे जेव्हा ओटीपोट पुढे आल्यासारखे वाटते आणि कंबर थोडी गळून गेल्यासारखी दिसते; ज्यामुळे कंबरेला दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच याउलट पोस्टेरियर पेल्विक टिल्टमध्ये ओटीपोट आतमध्ये जाते आणि कंबरेला चांगला आधार मिळतो.

सुटलेलं पोट कमी करायचं आहे? (Belly Fat Exercise)

त्यामुळे तुमचे शरीर पोस्टेरियर पेल्विक टिल्टमध्ये आणण्यासाठी तुम्हाला सी-सॉसारखा व्यायाम करायचा आहे. सुरुवातीला सरळ उभे रहा. छाती फुगवू नका. तुमच्या शरीराची स्थिती थोडी खाली नैसर्गिक ठेवा. एक बोट ओटीपोटावर ठेवा आणि दुसरे बोट कंबरेवर ठेवा. नंतर मणक्याच्या बरोबरीला आणण्यासाठी बोटाच्या साह्याने ओटीपोट थोडे वरच्या दिशेला न्या. त्यामुळे आपोआप कंबरसुद्धा खालच्या दिशेला जाईल. जसे की, तुम्हाला माहिती आहे की, सी-सॉ खेळ खेळताना आपण वरच्या आणि खालच्या दिशेला झुकले जातो, अगदी त्याचप्रमाणे हा व्यायाम करायचा आहे. हे सगळं केल्यावर जसे आपण जीन्सची चेन लावताना पोट आतमध्ये घेतो अगदी तसेच करा. हा व्यायाम करताना श्वास रोखून ठेवू नका. तुम्हाला सुरुवातीला विचित्र वाटेल; पण सराव करणे सोडू नका. तुमच्या योगाभ्यासाद्वारे एखादी वस्तू उचलताना किंवा अगदी डान्स करताना तुम्ही हा उपाय करून पाहू शकता. सुटलेले पोट कमी करण्यासाठी आणि पाठदुखी व इजा टाळण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की मदत करेल, असे तिने व्हिडीओत मजकुराद्वारे सांगितले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ विद्या माळवदेच्या @vidyamalavade’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सदेखील व्हिडीओ पाहून हा उपाय खूपच फायद्याचा आहे, असे सांगत अभिनेत्रीला धन्यवाद देताना दिसत आहेत. सुटलेले पोट कमी करण्यासाठी आणि पाठदुखी टाळण्यासाठी तुम्हीही हा उपाय नक्की करून पाहा आणि काही फरक पडतो का ते आम्हालाही नक्की कळवा.