Best Time to Check Weight: आपल्यापैकी अनेक जण रोज सकाळ-संध्याकाळ वजनकाट्यावर उभं राहून स्वतःचं वजन मोजत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का, दिवसातल्या वेगवेगळ्या वेळेत तुमचं वजन तब्बल एक किलोपर्यंत बदलू शकतं? होय. आहार, पाणी, झोप, व्यायाम व शरीरातील हार्मोनल बदल यांमुळे वजन सतत बदलतं. त्यामुळे चुकीच्या वेळी वजनकाट्यावर उभं राहणं म्हणजे स्वतःलाच गोंधळवून टाकणं. तज्ज्ञांच्या मते, हे चुकीचं पाऊल तुमचं वजन कमी करण्याचं किंवा वाढवण्याचं लक्ष्य बिघडवू शकतं.

दररोज वजनकाट्यावर उभं राहून वजन मोजता? मग थांबा… कारण- तुमची वजन मोजण्याची ही सवय तुमच्या शरीर तंदुरुस्त राखण्याच्या लक्ष्याला धक्का देऊ शकते. चुकीच्या वेळी वजन मोजल्याने तुमचा आत्मविश्वास डळमळतो, वजन कमी/वाढवण्याची मेहनत वाया जाते. वजनकाट्यावर चढण्याची एक वेळ अशी आहे, ज्या वेळी वजन मोजणं म्हणजे आरशात स्वतःचं खोटं प्रतिबिंब पाहण्यासारखं आहे. पण, मग खरं वजन कधी मोजायचं? याचं उत्तर जाणून घेणं तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

वजन मोजण्याची चुकीची वेळ

  • व्यायामानंतर लगेच – जोरदार व्यायामानंतर घामामुळे पाणी कमी होतं किंवा स्नायूंमध्ये सूज येऊन वजन वाढलेलं दिसू शकतं.
  • खारट जेवणानंतर – मिठामुळे शरीरात पाणी भरलं जातं आणि वजन तात्पुरतं जास्त दाखवतं.
  • लांबच्या प्रवासानंतर – प्रवासामुळे शरीरात पाणी व इलेक्ट्रोलाइट असमतोल निर्माण होतो.
  • दिवसभरात कुठल्याही वेळी सकाळ, दुपार, संध्याकाळ… प्रत्येक वेळी वजन वेगळं दाखवतं.
  • तणावाखाली किंवा चिंता असताना – वजनकाट्यावरचा आकडा पाहून, तुम्ही निराश होऊ शकता.
  • सप्ताहाच्या सुरुवातीला (सोमवारी) – वीकेंडच्या खाण्यापिण्यामुळे वजन जास्त दाखवलं जाऊ शकतं.
  • पाळीपूर्वी व पाळीच्या काळात – शरीरात पाणी साठल्यामुळे वजन वाढल्यासारखं वाटतं.

मग योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञ सांगतात –

  • आठवड्यातून एकदा वजनकाट्यावर उभं राहा. दररोज वजन मोजल्यानं फक्त गोंधळ होतो.
  • सकाळी उठल्यावर, बाथरूमला गेल्यानंतर आणि काही खाण्यापिण्यापूर्वी वजन मोजा. या वेळा शरीराचं खरं वजन दाखवतृत.
  • नेहमी आहाराचं तेच प्रमाण, तीच जागा आणि सारखीच परिस्थिती ठेवा म्हणजे फरक समजायला सोपं जाईल.

किती वेळा वजन मोजावं?

वजन कमी किंवा कायम ठेवायचं असल्यास – आठवड्यातून एकदा.
जास्त ताण नको असल्यास – महिन्यातून एकदा.
रोज त्यांनीच वजन पाहावं, ज्यांना त्यातून प्रेरणा मिळते आणि मानसिक ताण येत नाही.

थोडक्यात, चुकीच्या वेळी वजन मोजून स्वतःची चिंता वाढवण्यापेक्षा योग्य वेळेत, योग्य पद्धतीने वजन मोजा. नाही तर आकडा बघून, तुम्हालाच तुमची मेहनत वाया गेल्यासारखी वाटेल.