Signs of Poor Circulation in Legs: आपल्याला कधी पाय थंड वाटतात का? सतत सूज राहते किंवा रात्री पायांना आकडी धरते का? तर सावधान व्हा! ही काही साधी लक्षणं नाहीत, तर शरीराच्या आत दडलेला मोठा इशारा असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, शरीरात रक्ताचा पुरवठा नीट न झाल्यास सर्वात आधी त्याचे संकेत पायांमध्ये दिसून येतात, कारण हे भाग हृदयापासून सर्वात लांब असतात.

रक्ताभिसरण (ब्लड सर्क्युलेशन) नीट न झाल्यास शरीरातील अवयवांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही, त्यामुळे पेशी कमकुवत होतात, जखमा भरायला वेळ लागतो आणि गंभीर परिस्थितीत हृदय व मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. पण, चांगली गोष्ट म्हणजे ही लक्षणं ओळखली तर तुम्हाला वेळीच निदान होऊन मोठ्या आजारांपासून वाचू शकता. पाहूया पायांमध्ये दिसणारी ‘ती’ ३ लक्षणं, जी खराब रक्ताभिसरणाचा इशारा देतात.

१. पाय सतत थंड राहणे

जर तुमचे पाय नेहमी थंड रहात असतील, विशेषतः हिवाळा नसतानाही, तर हे रक्तपुरवठा कमी झाल्याचे लक्षण असू शकते. धमन्यांमध्ये अडथळा आल्यास रक्त खालपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे पायांना उब मिळत नाही. जर त्यासोबत पायांचा रंग निळसर दिसत असेल किंवा बधिरपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. टाचांजवळ सूज येणे

पाय किंवा टाचांमध्ये सूज येत असेल तर ते शरीरातील द्रव साचल्याचे लक्षण आहे. रक्ताचा प्रवाह मंदावल्याने द्रव खाली साचतो आणि त्यामुळे सूज येते, याला “एडिमा” म्हणतात. एकाच पायात अचानक सूज आली किंवा सूजेसोबत वेदना व लालसरपणा दिसत असेल तर हे गंभीर रक्तवाहिनीसंबंधी समस्येचे लक्षण असू शकते.

३. पायांना आकडी येते किंवा वेदना होतात

रात्री झोपेत पायांना आकडी येते? चालताना पिंडऱ्यांमध्ये वेदना होतात? मग हा रक्तपुरवठा कमी झाल्याचा ठळक इशारा आहे. धमन्या अरुंद झाल्याने पायांच्या स्नायूंना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे वेदना निर्माण होतात.

उपाय काय?

नियमित चालणे, हलके व्यायाम विशेषतः पिंडऱ्यांचे व्यायाम हे रक्ताभिसरण सुधारतात. दररोज चालण्याने रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायू मजबूत होतात. जर ही लक्षणं कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आवश्यक असल्यास अँकल-ब्रेकियल इंडेक्स (ABI) किंवा अल्ट्रासाऊंड तपासणीद्वारे रक्तवाहिन्यांची स्थिती तपासता येते.

थोडक्यात, पायांकडून मिळणारे हे संकेत दुर्लक्षित करू नका. वेळेत काळजी घेतली, तर हृदय, मेंदू आणि किडनीवरील मोठे धोके टाळता येऊ शकतात.