अनेकदा चुकीच्या साईजची ब्रा घातल्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. पण अनेक महिलांना हे माहितच नसते की, ब्रामुळेही त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतात. अनेक महिला रात्रीही ब्रा घालून झोपतात जे आरोग्यासाठी एकाअर्थी चांगले नसते. अनेकदा ब्रामुळे मान, हात आणि खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवतात. काही महिलांना या समस्या फार लहान वाटतात, तसेच अपुऱ्या माहितीमुळे अशा दुखण्याकडे त्या दुर्लक्ष करतात. अशा समस्येला ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम असे म्हणतात. यामुळे हा आजार नेमका काय आहे समजून घेऊ….
ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम म्हणजे काय?
‘ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम’ याला वैद्यकीय भाषेत ‘कॉस्टोक्लॅविक्युलर सिंड्रोम’ असेही म्हणतात. अनेकदा फिगर फिट दिसण्यासाठी महिला एकदम घट्ट ब्रा घालतात, अशा ब्रामुळे फिगर नीट दिसत असली तरी त्याचा नकळतपणे आरोग्यावर परिणाम होत असतो. जड स्तन असलेल्या महिला पातळ पट्टीची ब्रा घालतात, त्यामुळे त्यांच्या स्तनांचा संपूर्ण भार ब्रावर पडतो. ब्राच्या पट्ट्या खांद्यावरुन खाली येऊ लागतात कारण या पट्ट्यांवर अधिक दबाव येतो, ज्यामुळे तुम्हाला खांद्यामध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात. अशा परिस्थितीत थोरॅसिक आउटलेट, नसा, रक्तवाहिन्या किंवा दोन्हीमध्ये तीव्र वेदना होतात. थोरॅसिक आउटलेट म्हणजे (छातीच्या बरगड्यांमधील जागा)
ब्रा स्ट्रॅप सिंड्रोममुळे जाणवतात ‘या’ समस्या
१) मान आणि खांद्यामध्ये तीव्र वेदना
२) अवघडलेपणा आणि थकवा
३)मज्जातंतूंना इजा होऊ शकते
४) स्नायू कमकुवत होऊ शकतात
५) जड वस्तू उचलण्यात अडचण
६) शारीरिक हालचाली केल्यानंतर वेदना वाढणे
७) खांद्यांमध्ये मुंग्या येणे
ढोबळी मिरची खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहितीयेत का? आहारतज्ज्ञांकडून जाणून घ्या …
जड स्तन असलेल्या महिलांना धोका अधिक
एका संशोधनातून असे समोर आले आहे की, जड स्तन असलेल्या महिलांना या सिंड्रोमचा धोका अधिक असतो. जड स्तन असलेल्या स्त्रिया जेव्हा अतिशय छोट्या पट्टीच्या ब्रा घालतात तेव्हा कॉस्टोक्लाव्हिक्युलर पॅसेजचे कॉम्प्रेशन होते. अशा स्थितीत संबंधीत महिलेने जाड आणि रुंद पट्टीची ब्रा घातली पाहिजे, कारण छोट्या पट्टीच्या ब्रामुळे खांद्यावर वजन येऊन दुखापत होते. तसेच तुमच्या स्तनांवर आणि खांद्यावर खूप भार येतो. अशा स्थितीत ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो.
ब्रा स्ट्रॅप सिंड्रोम टाळण्यासाठी उपाय
१) रात्री ब्रा न घालता झोपा
२) घट्ट ब्रा घालू नका
३) पण रुंद पट्टीच्या ब्रा वापरा
४) नियमित व्यायाम करा
५) वेदना कमी करण्यासाठी १० मिनिटे गरम पाण्याने शेकवा
६) खांद्यावर कोणतीही जड वस्तू घेणे टाळा.