Brain stroke symptoms: ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये मेंदूला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा खंडित होतो. रक्तपुरवठ्यात व्यत्यय आल्याने ऑक्सिजन आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरण्यास सुरुवात होते. वेळेवर उपचार न केल्यास ही नकारात्मक क्रिया प्राणघातक ठरू शकते. स्ट्रोकला वैद्यकीय भाषेत सेरेब्रोव्हस्क्युलर अॅक्सिडेंट (CVA) म्हणतात. या स्थितीत, जेव्हा मेंदूच्या नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा रक्तवाहिन्या फुटू शकतात. ब्रेन स्ट्रोक तीन प्रकारचा असतो, चला तर मग त्याबाबत जाणून घेऊयात…इस्केमिक स्ट्रोक हा सुमारे ८५% प्रकरणांमध्ये आढळतो, जो स्ट्रोकचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. त्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.
रक्तस्राव स्ट्रोक – ज्यामध्ये मेंदूतील कोणतीही रक्तवाहिनी फुटू शकते आणि मेंदूमध्ये रक्त वाहू लागते. ही स्थिती उच्च रक्तदाब किंवा मेंदूतील धमनीविकारामुळे उदभवू शकते. मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे फुगवटा निर्माण होणे म्हणजे ब्रेन एन्युरिझम. ही एक धोकादायक स्थिती असू शकते; विशेषतः रक्तवाहिनी जर फुटली तर.
मिनी स्ट्रोक – हा एक तात्पुरता स्ट्रोक आहे, ज्यामध्ये रक्तप्रवाह काही काळासाठी थांबतो. या समस्येची लक्षणे काही काळाने कमी होतात; परंतु हा एक धोक्याचा इशारा मानला जातो.
एचटीमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, बंगळुरू येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे एमडी जनरल फिजिशियन डॉ. रवी केसरी म्हणाले की, सीव्हीए किंवा स्ट्रोक ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये त्वरित वैद्यकीय मदत घेणे खूप महत्वाचे आहे. जर या लक्षणांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले, तर त्यामुळे शरीराचे दीर्घकालीन नुकसानही होऊ शकते. डॉक्टरांनी सांगितले की, स्ट्रोकचा त्रास झाल्यावर रुग्णाचा जीव वाचवायचा असेल, तर वेळीच त्या दृष्टीने हालचाली करणे खूप महत्वाचे आहे.
जर वेळेवर उपचार मिळाले, तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. स्ट्रोक येण्यापूर्वी आपले शरीर काही इशारा देणारे संकेत देते, जे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. रवी केसरी म्हणाले की ‘BE FAST’ हे एक संक्षिप्त रूप आहे, जे स्ट्रोकच्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या लक्षणांना सूचित करते. ‘BE FAST’ या अक्षरांनी स्ट्रोकची लक्षणे कशी ओळखायची हे तज्ञांकडून जाणून घेऊ…
ब्रेन स्ट्रोक येण्याच्या ३ तास आधी शरीरात तीव्रतेने दिसणारी लक्षणे खालीलप्रमाणे
संतुलन बिघडणे- स्ट्रोकदरम्यान, रुग्णाला अचानक चक्कर येते आणि त्याचा तोल जाऊ लागतो.
डोळे- म्हणजे दोन्ही डोळ्यांमध्ये अंधुक दृष्टी किंवा एका डोळ्याची दृष्टी कमी होणे.
चेहरा- हसताना चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना सुन्नपणा
हात- म्हणजे दोन्ही हात वर केल्यावर एक हात आपोआप खाली पडतो
बोलणे- बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो म्हणजेच शब्द अस्पष्टपणे बाहेर पडतात किंवा योग्य शब्द निवडण्यात अडचण येते.
वेळ- म्हणजे ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या आणि लक्षणे दिसण्याची नेमकी वेळ लक्षात घ्या. त्यामुळे योग्य ते उपचार निवडण्यास मदत होते.
ही लक्षणेदेखील जबाबदार असू शकतात
डॉ. केसरी यांनी अहवालात सांगितले की, चेहरा आणि हातांव्यतिरिक्त शरीराच्या कोणत्याही भागात सुन्नपणा येणे ही देखील स्ट्रोकची लक्षणे असू शकतात.
शरीराचा एखादा भाग सुन्न पडतो किंवा त्या भागाला अर्धांगवायू होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला हातपायांमध्ये असामान्य संवेदना, बॅलन्स बिघडणे, अचानक तीव्र डोकेदुखी, झटके येणे आणि बेशुद्धी जाणवू शकते. ब्रेन स्ट्रोक मेंदूच्या विविध भागांना अस्थिर करू शकतो. म्हणूनचया लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.