Cancer in Indian Men vs Women: कॅन्सर म्हटलं की, मृत्यूची घंटा वाजल्यासारखं वाटतं; पण भारतातील ताज्या आकडेवारीतून जे समोर आलं आहे, ते धक्कादायक आणि गोंधळात टाकणारं आहे. स्त्रियांमध्ये कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळतात; पण पुरुषांमध्ये मृत्यूचं प्रमाण दुपटीनं जास्त आहे. हा विरोधाभास डॉक्टर आणि संशोधकांनाही बुचकळ्यात टाकतोय.

‘स्त्रियांना कॅन्सर जास्त; पण पुरुष आधी मरतात’ हा निष्कर्ष वाचून तुम्हीही थक्क व्हाल. भारताच्या कॅन्सर नोंदणीतून उघड झालेलं हे सत्य केवळ आकडे नाहीत, तर जीवन-मरणाचा थरार आहे, ज्यामागचं कारण ऐकून अंगावर काटा येईल.

महिलांमध्ये का जास्त?

भारतात स्त्रियांमध्ये स्तन (ब्रेस्ट), गर्भाशयमुख (सर्व्हायकल) व अंडाशय (ओव्हरी) या अवयवांना कर्करोगाने सर्वाधिक प्रमाणात ग्रासल्याचे आढळते. महिलांमधील ४०% प्रकरणांत फक्त स्तन व गर्भाशयमुख यांना कर्करोग झाल्याचे लक्षात आले आहे. जीवनशैलीतील बदल, उशिरा होणारी गर्भधारणा, स्तनपान कमी होणं, स्थूलपणा व हार्मोनल बदल यांमुळे महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचे दिसतेय.

पण जागरूकतेच्या मोहिमा, तपासण्या व वैद्यकीय सुविधा यामुळे महिलांमध्ये हा कॅन्सर तुलनेने लवकर लक्षात येतो. त्यामुळे मृत्युदर कमी आहे.

मग पुरुषांमध्ये मृत्यू का जास्त?

पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात तोंड, फुप्फुस व पुरुषस्थ ग्रंथी यांना कर्करोग झाल्याचे आढळते. पुरुषांना ४०% टाळता येणारे कर्करोग फक्त तंबाखू आणि धूम्रपानामुळे झाल्याचे लक्षात आले आहे. हे कर्करोग आक्रमक, वेगाने वाढणारे आणि उपचाराला कमी प्रतिसाद देणारे असतात.

यात भर म्हणजे पुरुष अनेकदा डॉक्टरकडे जाणं टाळतात, तपासणी करीत नाहीत, औषधांकडे दुर्लक्ष करतात. लक्षणं दिसली तरी उशिरा रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे पुरुषांमधील मृत्युदर महिलांपेक्षा खूपच जास्त दिसून येतो.

ईशान्य भारत कॅन्सरचा हॉट स्पॉट

ईशान्य भारतात कॅन्सरचं प्रमाण दुपटीने जास्त आहे. मिझोराममधील आयझॉल जिल्ह्यात देशातील कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तेथे तंबाखू, सुपारी, अल्कोहोल, तसेच मांस शिजवण्याच्या पद्धती यांमुळे धोका वाढतो.

तर काश्मीरमध्ये पुरुषांमध्ये फुप्फुसाचा कॅन्सर सर्वाधिक, तर हैदराबादमध्ये महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर वाढतोय. दिल्लीमध्ये पुरुष सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये आघाडीवर आहेत.

खरी भीती काय?

तज्ज्ञ सांगतात की, भारताचा कॅन्सरचे प्रमाण वाढते तर आहेच; पण तो अधिक गुंतागुंतीचाही होत चाललाय. जीवनशैली, अन्नपद्धती, पर्यावरण व जागरूकतेतील तफावत कॅन्सरला आणखी धोकादायक बनवतेय.

डॉक्टरांचा सल्लावजा स्पष्ट म्हणणे आहे

  • तंबाखू सोडा
  • लवकर निदानासाठी तपासण्या नियमित करा
  • स्त्रियांप्रमाणे पुरुषांनीही आरोग्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं

आज लक्ष दिलं नाही, तर उद्या उशीर होईल… आणि मग कॅन्सरचं सावट प्रत्येक घरावर पसरू शकतं.