What are the Best Superfoods for Fighting Cancer: कोलोरेक्टल कॅन्सर, ज्याला सामान्यतः कोलन कॅन्सर म्हणतात. हा पुरुष आणि महिला दोघांमध्येही सर्वाधिक आढळणाऱ्या कॅन्सरपैकी एक आहे. हा आजार मोठ्या आतड्यात म्हणजेच कोलन किंवा रेक्टममध्ये होतो. साधारणतः नॉन-कॅन्सरस गाठींमधून (polyps) तो विकसित होतो. जगभरात हा कॅन्सर अतिशय सामान्य असून केवळ अमेरिकेतच या कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं दुसरं मोठं कारण मानलं जातं. स्थूलपणा आणि मद्यपान या सवयींमुळे तरुणांमध्येही या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. डॉक्टरांच्या मते, पूर्वी वृद्धांचा आजार मानला जाणारा हा कॅन्सर आता ५० वर्षांखालील लोकांनाही मोठ्या प्रमाणात जखडतो आहे.
पण, याच काळोखात आता आशेचा किरण दिसतो आहे. नव्या संशोधनाने एक धक्कादायक पण सुखद उलगडा केला आहे. दररोज फक्त ४० ते ६० ग्रॅम क्रुसिफेरस भाज्या (ब्रोकली, फ्लॉवर, कोबी, केल, ब्रुसेल्स स्प्राउट्स) खाल्ल्यास कोलन कॅन्सरचा धोका तब्बल २०-२६% ने कमी होतो.
संशोधन काय सांगतं?
BMC Gastroenterology मध्ये प्रकाशित एका प्रचंड मोठ्या अभ्यासात तब्बल ६,३९,५०० लोकांचा डेटा तपासण्यात आला. त्यापैकी ९७,५९५ रुग्णांना कोलोरेक्टल कॅन्सर होता. निकाल आश्चर्यचकित करणारा होता. ज्यांनी सर्वाधिक प्रमाणात क्रुसिफेरस भाज्या खाल्ल्या त्यांचा कॅन्सर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत २०-२६% ने कमी होता. दररोज सुमारे ४०-६० ग्रॅम (अर्धा कप ब्रोकली किंवा त्याच्या समकक्ष भाजी) खाल्ल्यास हा फायदा दिसून आला. पण, ६० ग्रॅमपेक्षा जास्त खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा दिसला नाही.
या भाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन C, कॅरोटिनॉइड्स, फ्लॅवोनॉइड्स आणि ग्लुकोसिनोलेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. या ग्लुकोसिनोलेट्सपासून तोंडात चावल्यावर किंवा भाज्या कापल्यावर तयार होणारा सल्फोराफेन हा घटक शरीरातील डिटॉक्स सिस्टीम सक्रिय करतो, सूज कमी करतो आणि पेशींची दुरुस्ती करतो. हे सर्व घटक कॅन्सरपासून बचाव करतात.
आहारात कसा समाविष्ट कराल?
- नाश्त्यात अंड्याच्या ऑम्लेटमध्ये वाफवलेला ब्रोकली घाला.
- दुपारी कोशिंबिरीत कोबी किंवा केल (Kale – हिरव्या पानांची भाजी, पालकासारखी दिसते) मिसळा
- रात्री स्टर-फ्राय किंवा पास्तामध्ये फ्लॉवर टाका.
- स्नॅक्समध्ये रोस्टेड ब्रुसेल्स स्प्राउट्स किंवा केल चिप्स खा.
तज्ज्ञ सांगतात की, अशा छोट्याशा आहारातील बदलामुळे दीर्घकाळात मोठा फरक पडतो. अर्थातच फक्त एक भाजी कॅन्सर टाळू शकत नाही, पण नियमित व्यायाम, तपासणी, संपूर्ण वनस्पती-आधारित आहार आणि धूम्रपानापासून दूर राहणे हे सर्व एकत्रितपणे संरक्षणात्मक ढाल उभी करू शकतात.
लक्षात ठेवा
प्रत्येक चिरलेलं ब्रोकलीचं फूल महत्त्वाचं आहे. आजची छोटीशी सवय उद्याच्या मोठ्या आजारापासून तुम्हाला वाचवू शकते. कॅन्सरविरुद्धची खरी लढाई तुमच्या थाळीतूनच सुरू होते.
