Ayurvedic Remedy for Constipation: आजच्या धावपळीच्या आयुष्यात पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता (Constipation) ही समस्या जवळपास प्रत्येकाला त्रास देते. पोट नीट साफ न झालं की शरीर जड वाटू लागतं, डोकं दुखायला लागतं, गॅस, आम्लपित्त, पोटफुगी, चिडचिड अशा कितीतरी तक्रारी मागोमाग डोकं वर काढतात. डॉक्टर सांगतात की, बद्धकोष्ठता म्हणजेच अनेक आजारांचं मूळ आणि खरंच पाहिलं तर पोट साफ न झालं तर चेहऱ्यावर थकवा दिसतो, एनर्जी कमी होते, स्किनवर डलनेस येतो, अगदी मूडही खराब होतो. मग असा प्रश्न निर्माण होतो, काय करायचं? सतत औषधं खायची का? नाही! आयुर्वेद सांगतोय एक असं रहस्य, जे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, “हे तर मी आधी का नाही केलं?”

प्रसिद्ध आयुर्वेदिकतज्ज्ञ डॉक्टर सलीम जैदी यांनी सांगितलेला हा उपाय सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, रात्री झोपण्याआधी एक खास पान खाल्लं तर सकाळी पोट अगदी सहजपणे साफ होतं आणि त्यासाठी कुठलं महागडं औषध नाही, तर निसर्गानं दिलेलं एक साधं पान.

कसं करायचं सेवन?

  • त्या पानाची बारीक पावडर करून घ्या.
  • अर्धा चमचा पावडर घ्या, त्यात चिमूटभर काळं मीठ मिसळा.
  • कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्याआधी प्या.
  • फक्त ६ ते १० तासांत परिणाम दिसतो आणि सकाळी पोट एकदम हलकं.

पण लक्षात ठेवा- हे रोजचं नाही. आठवड्यातून जास्तीत जास्त १-२ वेळाच वापरा, नाहीतर शरीर त्यावर अवलंबून राहू शकतं. गर्भवती महिला, लहान मुलं आणि गंभीर आजार असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा.

त्याचबरोबर योग्य आहार, भरपूर पाणी पिणं आणि हलकीफुलकी व्यायामाची सवय ठेवा, म्हणजे परिणाम दुप्पट होतो.

आता प्रश्न असा, हे नेमकं पान कोणतं?

डॉक्टर जैदी सांगतात की, हे म्हणजेच “सनाचे पान” म्हणजे सेन्ना (Senna) या वनस्पतीचं पान. आयुर्वेदात याचा वापर शतकानुशतकं “कब्जहारा” म्हणून केला जातो. हे पान आतड्यांच्या स्नायूंना उत्तेजित करतं, त्यांची हालचाल वाढवतं आणि पोटातील मल सहजतेनं बाहेर टाकतं.

सना ही आयुर्वेदात प्रसिद्ध औषधी वनस्पती आहे. याला मराठीत सनामुखी किंवा सनायची पानं असं म्हटलं जातं. औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदात याला “स्वर्णपत्री” असंही एक नाव आहे. ही झुडुपासारखी वनस्पती असून तिला पिवळसर फुलं येतात. तिच्या कोरड्या पानांचा व शेंगांचा वापर बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी केला जातो. याची चव कडवटसर असते, पण यात नैसर्गिक laxative compounds (जुलाब आणणारे घटक) असतात, त्यामुळे पोटात अडकलेला मल सहज बाहेर पडतो आणि पोट साफ होतं. पण, औषध म्हणून याचा वापर डॉक्टर किंवा वैद्याच्या सल्ल्यानेच करावा, कारण जास्त वापरल्यास याची सवय लागू शकते.